IND vs NED : टीम इंडियाचा दिवाळी धमाका | पुढारी

IND vs NED : टीम इंडियाचा दिवाळी धमाका

बंगळूर, वृत्तसंस्था : टीम इंडियाने (IND vs NED) दिवाळीच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे बंगळुरातही विजयाचे फटाके फोडलेे. वर्ल्डकप-2023 च्या साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात भारताने नेदरलँडचा 160 धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप- 2023 मध्ये सलग 9 वा विजय नोंदवला. त्याने सौरव गांगुलीला मागे टाकले. गांगुलीने 2003 मध्ये सलग 8 मॅच जिंकल्या होत्या.

नेदरलँडविरुद्धच्या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. श्रेयस अय्यर (नाबाद 128) आणि के. एल. राहुल (102) यांची शतके आणि रोहित शर्मा (61), शुभमन गिल (51), विराट कोहली (51) यांनी अर्धशतके झळकावून भारताला 4 बाद 410 अशी जबरदस्त धावसंख्या उभी करून दिली. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ केवळ 250 धावा करू शकला. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी 2-2 विकेट घेतल्या. विराट कोहली आणि रोहित शर्मानेही प्रत्येकी एक विकेट घेतली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने 100 धावा जोडल्या आणि या वर्षातील ही त्यांची पाचवी शतकी भागीदारी ठरली. शुभमन 32 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 51 धावांवर बाद झाला, तर रोहितने 54 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 61 धावांची खेळी केली. विराटने त्यानंतर श्रेयस अय्यरसोबत भारताचा डाव पुढे नेला आणि 66 चेंडूंत 71 धावा जोडल्या. 56 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 51 धावांवर कोहली त्रिफळाचीत झाला आणि बंगळूरचे स्टेडियम शांत झाले. मात्र, श्रेयसच्या आतषबाजीने ते पुन्हा दणाणले. श्रेयस व के. एल. राहुल यांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. के. एल. राहुलनेही 40 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर श्रेयसने हात मोकळे करताना अर्धशतक पूर्ण केले.

श्रेयसने 84 चेंडूंत वर्ल्डकपमधील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. के. एल. राहुलनेही मग फटकेबाजी करताना शतकाच्या दिशेने वाटचाल केली. श्रेयसने 49 व्या षटकात 25 धावा कुटल्या. के. एल. राहुलने 50 व्या षटकाची सुरुवात षटकाराने केली आणि पुन्हा षटकार खेचून 62 चेंडूंत शतक झळकावले. त्याचेही हे वर्ल्डकपमधील पहिले शतक ठरले. तो 64 चेंडूंत 11 चौकार व 4 षटकारांसह 102 धावांवर बाद झाला आणि श्रेयससह त्याची 208 (128 चेंडू) धावांची भागीदारी तुटली. श्रेयस 94 चेंडूंत 10 चौकार व 5 षटकारांसह 128 धावांवर नाबाद राहिला. 20 व्या षटकापासून पॅड बांधून बसलेल्या सूर्यकुमारच्या वाट्याला शेवटचा चेेंडू आला, त्यावर त्याने दोन धावा घेतल्या. भारताने 4 बाद 410 धावा केल्या. (IND vs NED)

नेदरलँडच्या डावात मोहम्मद सिराजने दुसर्‍याच षटकात सलामीवीर वेस्ली बॅरेसीला (4) बाद केले. मॅक्स ओ डोड (30) आणि कॉलिन एकरमन (35) यांनी संघर्षमय 61 धावांची भागीदारी केली. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी या सेट फलंदाजांना माघारी पाठवले. सामन्यात पूर्ण वर्चस्व मिळवल्यानंतर भारताने प्रयोग करण्यास सुरुवात केली. रोहितने सहावा गोलंदाज म्हणून विराट कोहलीकडे चेंडू दिला. विराटने त्याच्या दुसर्‍या षटकात विकेट मिळवून दिली. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्डस् (17) वाईड जाणारा चेंडू छेडायला गेला अन् के. एल. राहुलने सुरेख झेल घेतला. 2014 मध्ये विराटने शेवटची विकेट घेतली होती आणि 9 वर्षांनंतर त्याने विकेट घेतली. विराटने विकेट घेताच स्टेडियम दणाणून गेलेच, परंतु त्याची पत्नी अनुष्कानेही जोरदार सेलिब्रेशन केले.

यानंतर रोहितने शुभमनकडूनही षटक फेकून घेतले. दुसर्‍या बाजूने जसप्रीत बुमराहचा मारा सुरू केला आणि त्याने बास डी लिडेचा (12) त्रिफळा उडवला. सूर्यकुमार यादवही गोलंदाजीला आला. सिराज पुन्हा मैदानावर आल्याने टीम इंडियाला दिलासा मिळाला. त्याने नेदरलँडचा सेट फलंदाज सायब्रांडला (45) बाद केले. नेदरलँडला 60 चेंडूंत 221 धावा विजयासाठी हव्या होत्या आणि 4 विकेटस् हाताशी होत्या. कुलदीपने आणखी एक धक्का देताना लोगन व्हॅन बीकचा (16) त्रिफळा उडवला. 8 चेंडूंत 16 धावा करणार्‍या रॉल्फ व्हॅन डर मर्वेला जडेजाने झेलबाद केला. बुमराहने आर्यन दत्तचा त्रिफळा उडवला. यानंतर गोलंदाजीला स्वत: कर्णधार रोहित शर्मा आला. त्याला षटकार ठोकून तेजा निदामनुरूने अर्धशतक पूर्ण केले. परंतु, पुढच्या चेंडूवर रोहितने त्याला शमीकडे झेल देण्यास भाग पाडले. नेदरलँडचा डाव 47.5 षटकांत 250 धावांत संपुष्टात आला. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांनी भारतापुढे अक्षरश: नांगी टाकली होती, त्यामानाने नेदरलँड संघाने चांगली झुंज दिली.

राहुलने मोडला रोहितचा विक्रम (IND vs NED)

टीम इंडियाचा स्टार फलंदाज के. एल. राहुलने वर्ल्डकप-2023 मध्ये नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. राहुलने 64 चेंडूंत 102 धावा केल्या. राहुलने कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला असून, तो विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 62 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. यापूर्वी रोहित शर्माने याच विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूंत शतक झळकावले होते.

Back to top button