

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ball Tampering New Zealand Player : वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात अचानक बॉल टॅम्परिंगचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या प्रकरणात न्यूझीलंडचा क्रिकेटर अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, न्यूझीलंडचा कसोटीपटू हेन्री निकोल्स एका देशांतर्गत प्रथम श्रेणी सामन्यात बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळला आहे. पंचांनी त्याच्याबद्दल तक्रार केली आणि म्हटले की निकोल्सने न्यूझीलंड क्रिकेटच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे.
रिपोर्टनुसार, न्यूझीलंड येथे सध्या प्रतिष्ठीत अशी प्लंकेट शील्ड स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत पाच दिवसांची सामने खेळवले जातात. दरम्यान, कँटरबरी आणि ऑकलंड यांच्यात हॅगले ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बॉल टॅम्परिंगचे प्रकरण घडले. कँटरबरीकडून खेळताना निकोल्सने चेंडू हेल्मेटवर घासल्याचे समोर आले. त्याने आचारसंहितेच्या नियम क्रमांक 3.1 आणि कलम 1.15 चे उल्लंघन केल्याचे पंचांनी म्हटले आहे, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेटने दिली आहे.
चेंडूच्या स्थितीशी छेडछाड करणे हे क्रिकेट नियम 41.3 चे उल्लंघन आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या मते, ही तक्रार प्रथम श्रेणी क्रिकेट कमिशनरशी संबंधित आहे. यावर आता सुनावणी होणार आहे. निकोल्स या महिन्याच्या अखेरीस विश्वचषक स्पर्धेनंतर बांगलादेश दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघात सामील होणार आहे. या आरोपांवर त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेन्री निकोल्सने न्यूझीलंडकडून 54 कसोटी, 72 एकदिवसीय आणि 10 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. निकोल्सने कसोटी क्रिकेटमध्ये 2948 धावा केल्या आहेत ज्यात 9 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 1960 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने एक शतक आणि 14 अर्धशतके फटकावली आहेत. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये त्याला 100 धावाच करता आल्या आहेत.
Here is the Henry Nicholls rubbing the ball on the helmet incident. pic.twitter.com/jwaliBIFYA
— Vincent Jones (@JonesVincentt) November 10, 2023