Trent Boult 50 Wickets : ट्रेंट बोल्टचा विश्वचषकात ‘महाविक्रम’, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही रचला इतिहास | पुढारी

Trent Boult 50 Wickets : ट्रेंट बोल्टचा विश्वचषकात ‘महाविक्रम’, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : Trent Boult ODI World Cup 50 Wickets : न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने विश्वचषकात इतिहास रचला आहे. त्याने गुरुवारी बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एक मोठा विक्रम नोंदवला. वनडे विश्वचषकाच्या इतिहासात 50 विकेट्स पूर्ण करणारा तो न्यूझीलंडचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. यासह बोल्ट जागतिक क्रिकेटमधील महान गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. यासोबतच त्याने या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 600 बळीही पूर्ण केले आहेत.

बोल्ट सहावा गोलंदाज

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राने (71) सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (68) दुसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कचा (59) तिस-या, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा (56) चौथ्या, पाकिस्तानचा वसीम अक्रम (55) पाचव्या क्रमांकांवर आहेत. या यादीत आता बोल्ट (52*) सहावा गोलंदाज ठरला आहे.

बोल्टचे आंतरराष्ट्रीय 600 बळी पूर्ण

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 600 विकेट्स पूर्ण करण्यात बोल्ट यशस्वी झाला आहे. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी डॅनियल व्हिटोरी आणि टीम सौदीने न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा पार केला आहे. साऊदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 731 विकेट घेतल्या आहेत. तर व्हिटोरीच्या नावावर 705 आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. (Trent Boult ODI World Cup 50 Wickets)

सातत्याने चांगली कामगिरी

बोल्टने 78 कसोटी सामन्यात 317 विकेट घेतल्या असून 112 वनडेत त्याच्या खात्यात 207 विकेट जमा आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्येही बोल्टने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याने 55 सामन्यात एकूण 74 बळी घेतले आहेत. बोल्ट हा अलीकडच्या काळात तो न्यूझीलंड संघातून बाहेर होता. पण आयसीसी विश्वचषक येताच तो पुन्हा संघात सामील झाला आणि सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तो आपल्या संघासाठी उर्वरित सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणे बाकी आहे. (Trent Boult ODI World Cup 50 Wickets)

Back to top button