National Games 2023 : नेमबाजीत महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटीलला सुवर्णपदक! रुद्रांक्ष पाटीलचे पदक हुकले | पुढारी

National Games 2023 : नेमबाजीत महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटीलला सुवर्णपदक! रुद्रांक्ष पाटीलचे पदक हुकले

फोंडा (गोवा), पुढारी वृत्तसेवा : National Games 2023 : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा पाटील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ‘सुवर्णलक्ष्य’ साधण्यात यशस्वी ठरली. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांक्ष पाटीलचे पदक मात्र थोडक्यात हुकले.

२५ मीटर पिस्तूलमध्ये कोल्हापूरच्या अभिज्ञाने पात्रता फेरीत ५८५ गुण मिळवून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत तिने ३५ गुण मिळवून बाजी मारली. अभिज्ञा रौनक पंडित यांच्याकडे नेमबाजीचे प्रशिक्षण घेते आहे. पंजाबच्या सिमरनप्रीत बी. हिला रौप्यपदक आणि हरयाणाच्या पायलला कांस्यपदक मिळाले. (National Games 2023)

१० मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांक्ष पात्रता फेरीत ६३०.४ गुण मिळवत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. पण अंतिम फेरीत त्याला चौथ्या क्रमांकाचे २०८.१ गुण मिळाले. महाराष्ट्राचा शाहू माने ६२७.५ गुण मिळवल्याने पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यात अपयशी ठरला. (National Games 2023)

महाराष्ट्राला नेमबाजीतले सुवर्णपदक जिंकून दिल्याचा अतिशय आनंद होतो आहे. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकचे माझे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने या स्पर्धेत मिळवलेले गुण मला ऑलिम्पिक पात्रतेसाठी उपयुक्त ठरतील. त्यामुळेच या स्पर्धेची मी खूप गांभीर्याने तयारी केली.
-अभिज्ञा पाटील

 

अभिज्ञाने पात्रता आणि अंतिम अशा दोन्ही फेऱ्यांमध्ये उत्तम कामगिरी केली. त्यामुळे अपेक्षेनुसार सुवर्णपदक मिळाले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वच नेमबाजांनी चांगली कामगिरी केली. पण तरीही काही पदके काही गुणांच्या फरकाने हुकली.
-श्रद्धा नलमवार, महाराष्ट्राच्या नेमबाजी प्रशिक्षक

Back to top button