Angelo Mathews Timed Out : विश्वचषकात गोंधळ! अँजेलो मॅथ्यूज ‘टाइम आऊट’, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले | पुढारी

Angelo Mathews Timed Out : विश्वचषकात गोंधळ! अँजेलो मॅथ्यूज 'टाइम आऊट', 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले

पुढारी ऑनलाईन डेस्क : Angelo Mathews Timed Out : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 38 व्या सामन्यात असे काही घडले, जे पाहिल्यानंतर कोणाचाही विश्वास बसणार नाही. श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी क्रिजवर आला, मात्र पंचांनी त्याला पॅव्हेलियनमध्ये परतण्यास सांगून बाद घोषित केले. या प्रकारानंतर मॅथ्यूज आणि पंचांमध्ये बराच वेळ वाद झाला, पण शेवटी लंकेच्या फलंदाजाला माघारी जावे लागले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाज टाईम आऊट होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

नेमके काय घडले?

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाने 24.2 व्या षटकात चौथी विकेट गमावली. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने सदीरा समरविक्रमाला बाद केले. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला. क्रिजवर पोहचून तो बॅटींगसाठी स्टान्स घेणार तोच त्याच्या लक्षात आले की, आपल्या हेल्मेटचा बेल्ट खराब झाला आहे. हे पाहून त्याने हेल्मेट काढले आणि ड्रेसिंग रुमकडे पाहत राखीव खेळाडूकडे नव्या हेल्मेटची मागणी केली. त्यावेळी तो क्रिजच्या बीहेर बराच उशीरा थांबला. त्याचवेळी बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने पंचांकडे अपील केले. दरम्यान, मॅथ्यूजला नवे हेल्मेट मिळाले. तो चेंडू खेळण्यासाठी सज्ज होणार तोच त्याला पंचांनी पॅव्हेलियनमध्ये जाण्यास सांगितले. हे पाहून मॅथ्यूजला आश्चर्य वाटले. जेव्हा त्याने पंचांना कारण विचारले तेव्हा त्याला कळले की त्याला क्रीजवर यायला खूप उशीर झाला होता आणि तो टाइमआउट झाला आहे. यानंतर मॅथ्यूज आणि पंचांमध्ये जोरदार वादावादी झाली. मॅथ्यूज विरोधी संघाचा कर्णधार शकिब अल हसनशीही बोलला, पण शाकिबही आपले अपील मागे घेण्यास तयार नव्हता. अशा स्थितीत मॅथ्यूजला एकही चेंडू न खेळता पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. मॅथ्यूज रागाच्या भरात मैदानाबाहेर गेला. त्याने हेल्मेट आणि बॅट फेकून दिली. श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूडही या संपूर्ण घटनेने चांगलेच संतापलेले दिसले. श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने बांगलादेशचे प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी दोघांसोबत चौथे पंचही उपस्थित होते. पण फलंदाज बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्याने हथुरुसिंहाच्या हातात काहीच नव्हते.

‘टाइम आउट’चा नियम काय आहे?

40.1.1 नियमानुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, नवीन फलंदाज 3 मिनिटांच्या आत पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. नवीन फलंदाज तसे करू शकला नाही तर त्याला बाद घोषित केले जाते. याला ‘टाइम आउट’ म्हणतात. तर 40.1.2 नियमानुसार, निर्धारित वेळेत (3 मिनिटे) नवीन फलंदाज खेळपट्टीवर आला नाही, तर मैदानी पंच नियम 16.3 ची प्रक्रिया पूर्ण करतील आणि फलंदाजाला ‘टाइम आऊट’ घोषित करतील.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6 फलंदाज झाले आहेत ‘टाइम आऊट’

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘टाइम आऊट’ होण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. पण याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असे घडले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6 फलंदाज ‘टाइम आऊट’चे बळी ठरले आहेत.

प्रथम श्रेणीत ‘टाइम आऊट’ झालेले फलंदाज :

अँड्र्यू जॉर्डन : (पूर्व प्रांत विरुद्ध ट्रान्सवाल, पोर्ट एलिझाबेथ 1987-88)
हेमुलाल यादव (त्रिपुरा विरुद्ध ओडिशा, कटक 1997)
व्हीसी ड्रॅक्स (बॉर्डर विरुद्ध फ्री स्टेट, ईस्ट लंडन 2002)
एजे हॅरिस (नॉटिंगहॅमशायर विरुद्ध डरहम, नॉटिंगहॅम 2003)
रायन ऑस्टिन (विंडवर्ड आयलंड विरुद्ध कम्बाइंड कॅम्पस अँड कॉलेज, सेंट व्हिन्सेंट 2013-14)
चार्ल्स कुंझे (मॅटाबेलँड टस्कर्स विरुद्ध माउंटेनियर्स, बुलावायो 2017)

 

Back to top button