व्ही.व्ही.एस. लक्ष्मण होणार राष्ट्रीय क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा प्रमुख | पुढारी

व्ही.व्ही.एस. लक्ष्मण होणार राष्ट्रीय क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा प्रमुख

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा (एनसीए) पुढील प्रमुख असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकार्‍याने रविवारी ही माहिती दिली. लक्ष्मण भारतीय संघाचा आपला माजी साथीदार दिग्गज फलंदाज राहुल द्रविडची जागा घेईल. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडला भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले.

व्ही.व्ही.एस. लक्ष्मण एनसीएचा नवीन प्रमुख असणार आहे, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. लक्ष्मणने यापूर्वीच इंडियन प्रीमियर लीग फ्रेंचायझी सन रायजर्स हैदराबादच्या मेंटरची भूमिका सोडली होती आणि लाभाच्या पदाच्या प्रकरणातून वाचण्यासाठी तो समालोचन देखील करणार नाही व लेखही लिहिणार नाही.

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक चार डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. त्यापूर्वी लक्ष्मणची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. लक्ष्मणने सुरुवातीला बीसीसीआयची ऑफर नाकारली होती. कारण हैदराबादहून स्थानांतरित होण्यास तो तयार नव्हता.

एनसीएसोबत आल्यानंतर लक्ष्मणला कमीत कमी 200 दिवस बंगळूरमध्ये राहावे लागेल. भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज लक्ष्मण आणि द्रविड आता एकत्र काम करतील. मुख्य प्रशिक्षक व एनसीए प्रमुख दरम्यान सामंजस्य असावे, असे बीसीसीआयला वाटते. याशिवाय लक्ष्मणला भारताच्या 19 वर्षाखालील आणि भारत अ संघाची तयारी देखील पाहावी लागेल.

लक्ष्मणची कारकीर्द

लक्ष्मणने 134 कसोटी सामन्यांत 8781 धावा केल्या असून त्यामध्ये 17 शतके आणि 56 अर्धशतकांचा समावेश आहे. 86 एकदिवसीय लढतीत त्याने 2338 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने सहा शतके व 10 अर्धशतके झळकावली. प्रथम श्रेणीत त्याने 267 लढतींमध्ये 19730 धावा केल्या असून त्यामध्ये 55 शतकं व 98 अर्धशतकांचा समावेश आहे.

Back to top button