National Games 2023 Goa : वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघ २६ वर्षांनी अंतिम फेरीत | पुढारी

National Games 2023 Goa : वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघ २६ वर्षांनी अंतिम फेरीत

पणजी, पुढारी वृत्तसेवा : National Games 2023 Goa : महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगाल संघावर १६-४ असा दणदणीत विजय नोंदवला आणि वॉटरपोलोमधील पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तब्बल २६ वर्षांनी महाराष्ट्र संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाला मात्र उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना आता कांस्यपदकासाठी खेळावे लागणार आहे.

पुरुषांच्या उपांत्य फेरीत अरुण मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच पश्चिम बंगाल विरुद्ध वर्चस्व गाजवले. महाराष्ट्रकडून सारंग वैद्य व उदय उत्तेकर यांनी प्रत्येकी चार गोल केले तर गौरव महाजनी व पियुष सूर्यवंशी यांनी प्रत्येकी दोन गोलांची नोंद केली. अंतिम फेरीत महाराष्ट्रास सेनादल संघाबरोबर खेळावे लागणार आहे. महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राला केरळ संघाने १६-७ असे सहज पराभूत केले. (National Games 2023 Goa)

शनिवारी सकाळी होणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्राची कर्नाटक संघाची गाठ पडणार आहे. त्यानंतर पुरुष गटाचा अंतिम सामना होणार आहे.

डायव्हिंगमध्ये ऋतिका श्रीरामची पदकांची हॅट्ट्रिक (National Games 2023 Goa)

महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने डायव्हिंगमध्ये एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात रौप्यपदक जिंकताना पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तिने १५१ गुण नोंदवले. या स्पर्धेमध्ये तिने या अगोदर एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकले होते. ऋतिका ही सोलापूरची खेळाडू असून तिचे पती हरिप्रसाद हेदेखील आंतरराष्ट्रीय डायव्हिंगपटू आहेत. रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या ऋतिकाला तीन वर्षांचा मुलगा असूनही ती नियमितपणे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. दोन वर्षांपूर्वी तिला राष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळाली होती तर गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील दोन सुवर्ण व एका कांस्यपदकाची कमाई केली होती.

Back to top button