‘ईडन गार्डन’वर विराटचा वाढदिवस होणार स्पेशल | पुढारी

‘ईडन गार्डन’वर विराटचा वाढदिवस होणार स्पेशल

कोलकाता, वृत्तसंस्था : 5 नोव्हेंबरला रंगणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय संघासाठी खास असणार आहे. कारण, याच दिवशी संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीचा 35 वा वाढदिवस आहे. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर होणार असून, किंग कोहलीच्या बर्थडेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. विराट कोहलीचा वाढदिवस संस्मरणीय बनवण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने विशेष तयारी केली आहे. या दिवशी स्टेडियममध्ये अंदाजे 70 हजार चाहते विराट कोहलीच्या मास्कमध्ये दिसतील. याशिवाय स्पेशल केक कापला जाणार आहे.

तसेच विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त ईडन गार्डन्समध्ये लेसर शोचे आयोजन करण्यात येणार आहे. रिपोटर्सनुसार, फटाक्यांच्या आतषबाजीत किंग कोहलीला शुभेच्छा दिल्या जातील. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरू होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला हरवून विराट कोहलीला विजयाची भेट देण्यासाठी प्रयत्नशील असेल. सध्या भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सर्व सहा सामने जिंकले असून, 12 गुणांसह संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Back to top button