ENG vs SL Match Highlights : इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामन्याचे 10 ठळक हायलाईट्स, इंग्लंड सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर! | पुढारी

ENG vs SL Match Highlights : इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामन्याचे 10 ठळक हायलाईट्स, इंग्लंड सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषकाच्या 25 व्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडला स्वस्तात बाद केले आणि त्यानंतर केवळ दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. टॉस गमावल्यानंतर लंकन संघाने पहिला गोलंदाजी केली आणि आपल्या भेदक मा-याने इंग्लिश संघाला अवघ्या 156 गुंडाळले. त्यानंतर पथुम निसांका (नाबाद 77) आणि सदीरा समरविक्रमा (नाबाद 65) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 25.4 षटकात 160 धावा करून श्रीलंकेने विजयावर शिक्कामोर्तब केला. समरविक्रमा आणि निसांका यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 137 धावांची विजयी भागीदारी झाली.

सामन्यातील ठळक घडामोडी जाणून घ्या…

1. इंग्लंडने जिंकला टॉस

बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला इंग्लंडचा संघ 33.2 षटकांत सर्वबाद झाला. संघाकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावा केल्या, तर सलामीवीर जॉन बेअरस्टोने 30 धावांचे योगदान दिले. डेव्हिड मलानने 28 धावा केल्या. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारने 3 तर कसून रजिथा आणि अँजेलो मॅथ्यूजने प्रत्येकी 2 बळी घेतले.

2. इंग्लिश संघाचे 5 फलंदाज एकेरी धावांवर बाद

इंग्लंडने पॉवरप्लेमध्ये धिम्यागतीने सुरुवात केली. यादरम्यान मलानच्या रुपात पहिला धक्का बसला. ज्यातून इंग्लिश संघ सावरला नाही. श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लिश फलंदाजांनी एकापाठोपाठ एक करत लोटांगण घातले. आणि विकेट गमावल्या. यादरम्यान श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकांनी काही चांगले झेल घेतले, तर इंग्लिश फलंदाज खराब फटके खेळून बाद झाले. स्टोक्सने 43 धावांची उपयुक्त खेळी केली. पण त्याला मोठ्या डावात त्याचे रुपांतर करता आले नाही.

3. श्रीलंकेचा भेदक मारा

श्रीलंकेच्या संघाने सामन्याच्या पहिल्या षटकापासूनच भेदक मारा केला. त्यांची गोलंदाजी इंग्लिश फलंदाजांना समजू शकली नाही. या विश्वचषकात पहिला सामना खेळणाऱ्या मॅथ्यूजने 2 बळी घेतले. त्याने 3 वर्षांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली. कसून रजिथा, लाहिरू, दिलशान मदुशंका आणि महेश तिक्षाना हे तिघेही या सामन्यात शानदार गोलंदाजी करताना दिसले. एक गोलंदाज फलंदाजांवर दबाव टाकत होता आणि दुसरा गोलंदाज विकेट घेत होता. गोलंदाजांनी धावा न देऊन फलंदाजांवर दबाव आणला. रजिताने 7 षटकांत 36 धावा दिल्या आणि महेशने 8.2 षटकांत केवळ 21 धावा दिल्या. मॅथ्यूजने 5 षटकांत 14 धावा दिल्या तर लाहिरूने 7 षटकांत केवळ 35 धावा दिल्या.

4. इंग्लंडच्या डावाची धिम्यागतीने सुरुवात

श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडने धिम्यागतीने सुरुवात केली. डेव्हिड मलान जॉनी बेअरस्टोसोबत फलंदाजीसाठी उतरला होता. श्रीलंकेसाठी दिलशान मदुशंकाने गोलंदाजीची सुरुवात केली. बेअरस्टो पहिल्याच षटकात बाद होण्यापासून थोडक्यात बचावला. सामन्यातील पहिला चेंडू बेअरस्टोच्या पॅडवर आदळला. श्रीलंकेच्या संघाने जोरदार अपील केले. पण पंचांनी हे अपील नाकारले. पण लंकन खेळाडूनी रिह्यू घेतला नाही. पण रिप्लेमध्ये हे स्पष्ट दिसत होते की, रिव्ह्यू घेतला असता तर बेअरस्टो बाद झाला असता. चेंडू थेट विकेटवर आदळत होता. श्रीलंकेच्या खेळाडूंनी चुका केल्या आणि पहिल्याच षटकात त्यांना विकेट घेता आली नाही. इंग्लंडची धावसंख्या दोन षटकांत बिनबाद सात धावा होती. बेअरस्टोने सात धावा केल्या. डेव्हिड मलानला खाते उघडता आले नव्हते.

5. अँजेलो मॅथ्यूजने मलानला केले बाद

श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने इंग्लंडविरुद्ध संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने डावाच्या सातव्या आणि पहिल्याच षटकात मलानला बाद केले. मलानने यष्टिरक्षक कुसल मेंडिसकरवी झेलबाद केले. त्याने 25 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. मॅथ्यूज या विश्वचषकात पहिला सामना खेळत आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडने सात षटकात एक विकेट गमावत 49 धावा केल्या होत्या.

6. जो रूट धावबाद

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट धावबाद झाला. 10व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याला एक धाव घ्यायची होती. रुट त्याच्या क्रीजच्या पुढे गेला होता. नॉन स्ट्रायकरवर उभ्या असलेला जॉनी बेअरस्टो काही पावले पुढे आला, पण तो थांबला. त्याने रूटला माघारी परतण्याचा कॉल दिला. मात्र, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुटने 10 चेंडूत तीन धावा केल्या. यावेळी इंग्लंडची धावसंख्या 10 षटकांत 2 बाद 59 होती.

7. बेअरस्टोही पॅव्हेलियनमध्ये परतला

राजिताने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. त्याने 14व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टो 31 चेंडूत 30 धावा करून धनंजय डी सिल्वाकरवी झेलबाद झाला.

8. लंकन गोलंदाजांपुढे इंग्लंडच्या फलंदाजांचे लोटांगण

श्रीलंकेच्या गोलंदाजांपुढे इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजांनी लोटांगण घातले आहे. 17 षटकांतच इंग्लिश संघाचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. या सामन्यातही कर्णधार जोस बटलरची बॅट चालली नाही. 15व्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. बटलरला लाहिरू कुमाराने यष्टिरक्षक कुसल मेंडिसच्या हाती झेलबाद केले. इंग्लिश कर्णधाराने सहा चेंडूत आठ धावा केल्या. त्यानंतर 17.6 व्या षटकात कुमाराने पुन्हा एकदा धक्का देत लियाम लिव्हिंगस्टनला पायचित केले. कुमाराची ही दुसरी विकेट ठरली. लिव्हिंगस्टनला 1 धावा करता आली. लेग साइडच्या दिशेने गुड लेंथवर टाकलेला वेगवान चेंडू लिव्हिंगस्टनने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू उसळला आणि बॅटला चकवा देत पॅडवर आदळला. LBW साठी मोठे अपील झाले. पंचानी जरासाही विलंब न करता बाद असल्याचा निर्णय दिला. लिव्हिंगस्टनने रिव्ह्यू घेतला. पण रिप्लेमध्ये चेंडू थेट लेगस्टंपला लागल्याचे दिसून आले. तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला. यावेळी इंग्लंडची धावसंख्या 85 होती.

9. इंग्लंडचा सुमार खेळ

अँजेलो मॅथ्यूजने श्रीलंकेला सहावे यश मिळवून दिले. त्याने 25व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोईन अलीला बाद केले. 15 चेंडूत 15 धावा करून मोईनने कुसल परेराला झेल दिला. ख्रिस वोक्सच्या रूपाने इंग्लंडला सातवा धक्का बसला. 26व्या षटकातील पाचव्या चेंडूवर वोक्सला कसून राजिताने बाद केले. सदिरा समरविक्रमाने शानदार झेल घेतला. वोक्सने चार चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. यावेळी इंग्लंडची धावसंख्या 123 होती. इंग्लंडची आठवी विकेट 137 धावांवर पडली. बेन स्टोक्स 73 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. लाहिरू कुमाराने त्याला दुषण हेमंतकरवी झेलबाद केले. इंग्लंडची नववी विकेट 147 धावांवर पडली. आदिल रशीद दोन धावा करून धावबाद झाला. श्रीलंकेचा यष्टिरक्षक कुसल मेंडिसने आपल्या हुशारीने संघाला विकेट मिळवून दिली. वाईड बॉल पकडल्यानंतर त्याला दिसले की दुसऱ्या टोकाचा फलंदाज रशीद क्रीजच्या बाहेर फिरत होता. याचा फायदा घेत मेंडिसने अचूक थ्रो मारत विकेट्स उडवल्या. त्याच्या शहाणपणाने श्रीलंकेला एक विकेट मिळाली. महेश तिक्षानाने इंग्लिश संघाला ऑलआऊट केले. त्याने मार्क वूडची विकेट घेत इंग्लंडचा डाव 156 धावांवर गारद झाला.

10. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची खराब सुरुवात

157 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि 23 धावा करताच त्यांचे दोन फलंदाज कुसल परेरा (4) आणि कुसल मेंडिस (11) गारद झाले. मात्र यानंतर सलामीवीर पथुम निसांका आणि सादिर समरविक्रमाने इंग्लिश गोलंदाजांचा संयमाने सामना केला. दोघेही शेवटपर्यंत नाबाद राहिले आणि तिसऱ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी करून सामना जिंकून दिला. त्यामुळे श्रीलंकेने 25.4 षटकांत 2 बाद 160 धावा केल्या आणि आठ विकेट राखून विजय मिळवला. श्रीलंकेसाठी निसांकाने 83 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 77 धावा केल्या. तर सदीरानेही 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 65 धावांची नाबाद खेळी केली. इंग्लंडकडून गोलंदाजीत केवळ डेव्हिड विलीने दोन विकेट घेतल्या.

इंग्लंड संघात तीन बदल

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने संघात तीन बदल केले आहेत. रीस टोपली, हॅरी ब्रूक आणि गस ऍटिंकसन या सामन्यात खेळणार नाहीत. ख्रिस वोक्स, मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन परतले आहेत. त्याचबरोबर अँजेलो मॅथ्यूज आणि लाहिरू कुमरा यांचे श्रीलंकेच्या संघात पुनरागमन झाले आहे.

इंग्लंड संघ :
जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.

श्रीलंका संघ :
पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर/कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महिष तिक्षना, कसून राजिथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.

Back to top button