न्यूझीलंडविरुद्ध शमी-सूर्याला संधी की, शार्दुल खेळणार? प्लेइंग 11 जाणून घ्या | पुढारी

न्यूझीलंडविरुद्ध शमी-सूर्याला संधी की, शार्दुल खेळणार? प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा समतोल बिघडला आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाचवा सामना किवींशी आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळले असून सर्व सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. हे असे दोन संघ आहेत ज्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. रविवारच्या सामन्यानंतर, एकच संघ असेल ज्याने आपले सर्व सामने जिंकले असतील आणि तो संघ गुणतालिकेत अव्वल असेल. अशा स्थितीत हा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

भारत आणि न्यूझीलंडचे संघ नक्कीच जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, पण दोन्ही संघ आपल्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा हार्दिक पंड्या जखमी झाला होता. त्याला बरे होण्यासाठी किमान आठवडा लागेल. हार्दिक हा असा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये 10 षटके टाकण्याची आणि बॅटनेही चमकदार खेळी करण्याची क्षमता आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल याची उत्सुकता लागले आहे.

भारतीय संघाला समतोल साधण्यासाठी संघात किमान दोन बदल करावे लागतील. पंड्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत तो फिनिशरच्या भूमिकेत असेल, जी आतापर्यंत हार्दिक बजावत होता. त्याचबरोबर गोलंदाजीत शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीचा समावेश केला जाऊ शकतो, जो आपली संपूर्ण 10 षटके टाकू शकतो आणि फलंदाजांना अडचणीत आणण्याची क्षमता त्याच्यात आहे. या स्थितीत भारताकडे जडेजाशिवाय सहा उत्कृष्ट फलंदाज असतील. त्याचबरोबर गोलंदाजीत जडेजा-कुलदीपच्या रूपाने दोन उत्कृष्ट फिरकीपटू आणि शमी, सिराज, बुमराहच्या रूपाने तीन उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असतील. मात्र, या स्थितीत सामन्यादरम्यान कोणताही गोलंदाज जखमी झाल्यास टीम इंडिया अडचणीत येऊ शकते.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची दुखापत ही किवी संघासाठी समस्या आहे. विल्यमसनला आयपीएल 2023 मध्ये दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. तो विश्वचषकातील सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करताना त्याने अर्धशतक झळकावले, पण त्याच सामन्यात तो दुखापतग्रस्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर नेअरलँड विरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकलेला नाही. अशातच त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला रचिन रवींद्रही शानदार फलंदाजी करत असून किवी संघ नियमित कर्णधार नसतानाही मोठ्या संघांना पराभूत करण्यात यशस्वी ठरला आहे.

दोन्ही संघांच्या संभावित प्लेईंग इलेव्हन

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

Back to top button