पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी केली. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील ४८ वे शतक झळकावले आणि विश्वचषकात भारताला सलग चौथा विजय मिळवून दिला. विराटने ६ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ९७ चेंडूमध्ये १०३ धावांची खेळी केली. बांगलादेशच्या २५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारतीय संघ सुरुवातीपासून मजबूत स्थितीत होता. (IND vs BAN Virat Kohli)
विराट जोरदार फटकेबाजी करत होता. सामन्यात भारताची मजबूत पकड होती. मात्र, कोहली त्याच्या शतकापासून १५ धावा दूर होता. भारत मजबूत स्थितीत असल्याने केएल राहुल सातत्याने विराटला स्ट्राईक देत होता. विराटने शतक पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा दोन धावा काढल्या. केएल राहुल शिवाय अंपायर रिचर्ड केटलबरो यांनीही विराटच्या शतकासाठी सहाय्य केले, असे दावे सोशल मीडियावरुन केले जात आहेत. (IND vs BAN Virat Kohli)
भारताला विजयासाठी २ धावांची गरज होती विराट ९७ धावांवर फलंदाजी करत होता. दरम्यान, नसुम अहमदने जाणूनबुजून वाइड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात विराट काहीच करू शकला नाही. मात्र, केटलबरोने वाईडचा इशाराच दिला नाही. पंचांच्या निर्णयामुळे भारतीच्या ड्रेसिंग रुममध्ये हशा पिकला होती. सध्या केटलबरो यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.(IND vs BAN Virat Kohli)