ICC World Cup : ऑस्ट्रेलियाने उघडले विजयाचे खाते, श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव | पुढारी

ICC World Cup : ऑस्ट्रेलियाने उघडले विजयाचे खाते, श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC World Cup : वर्ल्डकप 2023 च्या 14 व्या सामन्यात आज (दि. 16, सोमवार) ऑस्‍ट्रेलियाने श्रीलंकेचा 6 विकेट्स राखून पराभव करत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. कांगारूंनी आपल्या भेदक मा-याच्या जोरावर श्रीलंकेचा डाव 43.3 षटकांत 209 धावांत गुंडाळला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 35.2 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग केला. मिचेल मार्शने 52 आणि जोश इंग्लिसने 58 धावांची खेळी साकारली.

लॅबुशेन-इंग्लिशची उपयुक्त भागिदारी

210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली त्यांनी 24 धावांत 2 गडी गमावले. त्यानंतर मार्शने आणि इंग्लिश यांनी अर्धशतकी खेळी केली. इंग्लिशने सर्वाधिक 58, तर मार्शने 52 धावांची खेळी केली. लॅबुशेनने 40 धावा केल्या आणि इंग्लिशसोबत चौथ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. ग्लेन मॅक्सवेल 31 आणि मार्कस स्टॉइनिस 20 धावांवर नाबाद राहिला. डेव्हिड वॉर्नर 11 धावा करून बाद झाला. स्टीव्ह स्मिथला खातेही उघडता आले नाही. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने तीन तर दुनिथ वेल्लालागेने बळी घेतला.

चांगल्या सुरुवातीचा लंकन संघाला फायदा उठवता आला नाही

तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर (इकाना) हा सामना रंगला होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. सलामीवीर फलंदाज कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी केली. पण या चांगल्या सुरुवातीचा लंकन संघाला फायदा उठवता आला नाही. निसांका 61 धावा करून बाद झाला. त्यानंतर कुसल मेंडिसही लगेचच 78 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोघे बाद झाल्यानंतर लंकेचा संघ 209 धावांवर गडगडला.

निसांका आणि मेंडिस व्यतिरिक्त फक्त चरित अस्लंकाला दुहेरी आकडा गाठता आला. त्याने 25 धावा केल्या. दासून शनाका वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणा-या कुसल मेंडिसला केवळ नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा सदीरा समरविक्रमा आठ धावांवर बाद झाला. धनंजय डी सिल्वा सात आणि लाहिरू कुमारा चार धावा करून माघारी परतले. चमिका करुणारत्ने आणि दुनिथ वेललागे यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. महिशला तिक्षाणाला तर खातेही उघडता आले नाही. तर, दिलशान मदुशंका खाते न उघडता नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन बळी मिळवण्यात यश आले. ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली.

Back to top button