ख्रिस गेल ने टी-२० क्रिकेटमध्ये गाठला १४,००० धावांचा टप्पा | पुढारी

ख्रिस गेल ने टी-२० क्रिकेटमध्ये गाठला १४,००० धावांचा टप्पा

ग्रॉस आयलेट ; वृत्तसंस्था : वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने क्रिकेट जगतात आणखीन एक विक्रम आपल्या नावे केला आहे. तो टी-20 क्रिकेटमध्ये 14 हजार धावा करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. गेलने षटकार मारत हा विक्रम रचला. हा विक्रम त्याने ग्रॉस आयलेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसर्‍या टी-20 सामन्यादरम्यान केला.

सर्वाधिक टी-20 धावा करणार्‍यांच्या यादीत अव्वल पाचजणांमध्ये विराट कोहली हा एकमेव भारतीय आहे. कोहलीने आतापर्यंत 310 टी-20 सामन्यात 9,922 धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियन संघादरम्यान पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. वेस्ट इंडिज संघाने तिसर्‍या टी-20 सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघावर सहा विकेटस्ने विजय मिळवत मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी मिळवली. सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 141 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करणार्‍या वेस्ट इंडिज संघाने 14.5 षटकांत 4 बाद 142 धावसंख्येपर्यंत पोहोचत विजय मिळवला. या सामन्यात ख्रिस गेल याने 38 चेंडूंत 67 धावांची खेळी करीत हा विक्रम रचला.

चौघांच्या नावे 10 हजारहून अधिक धावा

आजवर टी-20 क्रिकेटमध्ये चार खेळाडूंच्या नावे 10 हजारहून अधिक धावा आहेत. ख्रिस गेल 14 हजार धावांसह यादीत अव्वल स्थानी आहे. दुसर्‍या स्थानावर वेस्ट इंडिजचा केरॉन पोलार्ड आहे. ज्याच्या नावे 10,836 धावा आहेत. पाकिस्तानचा शोएब मलिक (10,741) तिसर्‍या आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (10,017) चौथ्या स्थानी आहे.

Back to top button