Pakistan vs Australia : ऑस्ट्रेलिया भिडणार पाकशी | पुढारी

Pakistan vs Australia : ऑस्ट्रेलिया भिडणार पाकशी

दुबई ; वृत्तसंस्था : सध्या फॉर्मात असलेल्या पाकिस्तानची (Pakistan vs Australia) उद्या (गुरुवारी) टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या दुसर्‍या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे. विजय मिळवून फायनलमध्ये स्थान मिळविण्याच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानात उतरतील. वॉर्नर, फिंच आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर कांगारूंची मदार असेल.

ऑस्ट्रेलियन संघाने स्पर्धेत निर्णायक क्षणी चांगला खेळ करून सेमीफायनलपर्यंत मजल मारली आहे. आता त्यांचा प्रयत्न हा जेतेपद मिळवण्याचा असणार आहे. इंग्लंड विरुद्धचा पराभव वगळता फिंचच्या नेतृत्वाखालील संघाने सर्व सामने चांगल्या पद्धतीने जिंकले. तसेच, दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

ऑस्ट्रेलियाकडे जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्ससारखे गोलंदाज आहेत. यासोबतच अ‍ॅडम झम्पानेही चांगली कामगिरी केली असून, तो स्पर्धेतील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. (Pakistan vs Australia)

डेव्हिड वॉर्नर फॉर्मात येणे ही ऑस्ट्रेलियन संघासाठी जमेची बाजू आहे. खराब सुरुवातीनंतर वॉर्नरने दोन अर्धशतके झळकावली. फिंचकडूनदेखील चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. तिसर्‍या स्थानी मार्श चांगल्या फॉर्मात आहे. स्टिव्ह स्मिथवरदेखील संघाची जबाबदारी असेल. या मैदानावर आव्हानाचा पाठलाग करणार्‍या संघाने चमक दाखवली आहे. त्यामुळे सामन्यात नाणेफेक ही महत्त्वाची असणार आहे.

2016 विश्‍वचषक टी-20 स्पर्धेत पहिल्या फेरीतच गारद झालेल्या पाकिस्तानने यावेळी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणारा पाकिस्तान संघ अजूनही स्पर्धेत पराभूत झालेला नाही. यूएईमध्ये पाकिस्तानचा संघ दबावाखाली चांगली कामगिरी करत आहे आणि येथील परिस्थितीदेखील त्यांना चांगली माहिती आहे.

2009 मध्ये श्रीलंकन संघाच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट झालेले नाही आणि त्यामुळे त्यांनी यूएईमध्ये आपले सामने खेळले. भारताविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचा संघ आणखी मजबूत झाल्याचे दिसत आहे. न्यूझीलंड तसेच अफगाणिस्तान विरुद्ध कठीण परिस्थितीतदेखील त्यांनी सामने जिंकले आहेत. (Pakistan vs Australia)

बाबर आझम (264) याच्या नेतृत्वाखाली पाकची आघाडीची फलंदाजी मजबूत दिसत आहे; पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमणाला कमी लेखण्याची चूक मात्र महागात पडू शकते. बाबर आणि मोहम्मद रिझवानची सलामी जोडी अयशस्वी ठरली तर मधल्या फळीत पाककडे चांगले फलंदाज आहेत.

मोठे फटके मारणारा आसिफ अली आणि अनुभवी शोएब मलिक व मोहम्मद हाफिजसारखे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. पाकिस्तानच्या गोलंदाजी आक्रमणाने सर्वांना प्रभावित केले आहे. वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी व हॅरिस रौफ यांनी विरोधी फलंदाजांना अडचणीत आणले आहे. इमाद वसीम, मोहम्मद हाफिज आणि शादाब खान यांच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

Back to top button