ICC Cricket World Cup : द. आफ्रिकेचा तडाखा, कांगारूंचे लोटांगण; ऑस्ट्रेलियाचा 134 धावांची दारुण पराभव | पुढारी

ICC Cricket World Cup : द. आफ्रिकेचा तडाखा, कांगारूंचे लोटांगण; ऑस्ट्रेलियाचा 134 धावांची दारुण पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत शानदार सामन्यांचा टप्पा सुरू आहे. गुरुवारी (12 ऑक्टोबर) वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्लॉकबस्टर सामना झाला. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे झालेल्या या सामन्यात द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा तब्बल 134 धावांनी पराभव केला. आफ्रिकन संघाने प्रथम फलंदाजी करताना 311 धावा केल्या होत्या. त्यानंतर 312 धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारू संघ केवळ 177 धावांतच गारद झाला.

ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव

द. आफ्रिकेचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. तत्पूर्वी, पहिल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेचा 102 धावांनी पराभव करून विश्वचषक मोहिमेची शानदार सुरुवात केली होती. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात भारताकडून सहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता.

ऑस्ट्रेलियन संघाची खूपच खराब सुरुवात

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावल्या. सर्वात आधी मिचेल मार्शला (7) मार्को जॅनसेनने टेम्बा बावुमाच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरही 13 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये परतला. लुंगी एनगिडीने वॉर्नरला बाद केले. स्टीव्ह स्मिथने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण 19 धावांवर असताना स्मिथची शिकार कागिसो रबाडाने केली. तो एलबीडब्ल्यू झाला. ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स पडण्याची प्रक्रिया सुरूच होती. जोश इंग्लिश आणि मार्कस स्टॉइनिस यांना कागिसो रबाडाने बाद केले. तर मॅक्सवेल केशव महाराजच्या फिरकीत अडकला. 70 धावांवर सहा विकेट पडल्यानंतर मार्नस लॅबुशेन आणि मिचेल स्टार्क यांनी मिळून 69 धावांची भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाला 150 धावांच्या जवळ नेले. मार्को जॅन्सनने मिचेल स्टार्कला बाद करून ही भागीदारी तोडली. स्टार्कने 51 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या.

स्टार्कनंतर केशव महाराजच्या चेंडूवर मार्नस लॅबुशेननेही आपली विकेट गमावली. इथून द. आफ्रिकेला विजय मिळवणे सोपे झाले. ऑस्ट्रेलियासाठी मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक 46 धावा (74 चेंडू, तीन चौकार) केल्या. द. आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने तीन बळी घेतले. तर मार्को जॅनसेन, तबरेझ शम्सी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

क्विंटन डी कॉकने पुन्हा एकदा चौफेर फटकेबाजी

तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाने 50 षटकांत सात गडी गमावून 311 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने पुन्हा एकदा चौफेर फटकेबाजीने मैदान गाजवले. त्याने 106 चेंडूंत 102.83 च्या स्ट्राईक रेटने आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 109 धावा तडकावल्या. तर एडन मार्करामने 44 चेंडूत 56 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्कने 2-2 विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. पहिल्या विकेटसाठी डी कॉक आणि कर्णधार टेंबा बावुमा (35) यांच्यात 118 चेंडूत 108 धावांची भागीदारी झाली. यानंतर डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन (26) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 53 चेंडूत 50 धावांची भागीदारी झाली. मधल्या फळीत एडन मार्कराम (56) आणि हेनरिक क्लासेन (29) यांनी उपयुक्त खेळी करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. एके काळी द. आफ्रिकेचा संघ 350+ धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कमबॅक केले आणि एका षटकाच्या अंतराने मार्कराम आणि क्लासेनला माघारी धाडले. त्यानंतर डेथ ओव्हर्समध्येही घातक मारा केला, ज्यामुळे द. आफ्रिकेला कशीबशी धावसंख्या तीनशेच्या पुढे नेण्यात यश आले.

डी कॉकचे विश्वचषकातील सलग दुसरे शतक

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार टेंबा बावुमा आणि क्विंटन डी कॉक यांच्यात पहिल्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी झाली. बावुमा 35 धावा करून बाद झाला. यानंतर डी कॉकने रॅसी व्हॅन डर ड्युसेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. मात्र, ड्युसेन 26 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर डी कॉक आपल्या खेळीचा गिअर बदला आणि कांगारू गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने 90 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 19वे शतक ठरले. तर या विश्वचषकातील त्याने सलग दुसरे शतक फटकावण्याची किमया केली. यापूर्वीच्या सामन्यात डी कॉकने श्रीलंकेविरुद्ध 100 धावांची इनिंग खेळली केली होती.

ओपनर म्हणून 4 हजार धावा पूर्ण

डी कॉकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध डावाची सुरुवात करताना सहावी धाव घेताच वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करत 4,000 धावा पूर्ण केल्या. तसेच त्याने पुढे ऑस्ट्रेलियाविरुद्ध या फॉरमॅटमध्ये 1000 धावाही पूर्ण केल्या. कांगारूंविरुद्ध त्याने आतापर्यंत 29 सामन्यांत जवळपास 36 च्या सरासरीने आणि 97 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 1000 धावांचा पल्ला गाठला. यादरम्यान तो दोनदा नाबाद राहिला आहे. तसेच त्याच्या नावावर 3 शतके आणि 3 अर्धशतकांचीही नोंद आहे. कांगारूंविरुद्ध 178 धावा ही त्याची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे.

मार्करामचे वनडेतील 8 वे अर्धशतक

मार्करामने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखत शानदार खेळी खेळली. 127.27 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने 44 चेंडूत 56 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 8 वे अर्धशतक ठरले. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत 3 शतके झळकावली आहेत. याआधी त्याने मागील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शतक (106) केले होते.

ड्युसेनच्या वनडेत 2 हजार धावा पूर्ण

ड्युसेनने 18वी धावा काढताच त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील 2,000 धावा पूर्ण झाल्या. त्याने आपल्या 51 व्या सामन्यातील 46 व्या डावात हा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा 19 वा फलंदाज ठरला आहे. वनडेमध्ये सर्वात वेगवान 2,000 धावा पूर्ण करणारा ड्युस हा संयुक्तपणे तिसरा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानी फलंदाज इमाम उल हकनेही आपल्या 46व्या डावात ही कामगिरी केली होती. या यादीत पहिला क्रमांकावर द. आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला (40 डाव) आहे. झहीर अब्बास, केविन पीटरसन आणि बाबर आझम (45-45 डाव) दुसऱ्या स्थानावर आहेत.

सलग पाचव्या एकदिवसीय सामन्यात 300+ धावा

द. आफ्रिकेने सलग पाचव्या एकदिवसीय सामन्यात 300+ धावा केल्या. या बाबतीत आफ्रिकन संघाने भारत आणि श्रीलंकेसोबत संयुक्तपणे बरोबरी साधली. पहिल्या क्रमांकावर इंग्लंड (7) आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत (6-6) संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.

कांगारू गोलंदाज ठरले महागडे

कांगारू गोलंदाजांमध्ये मॅक्सवेल वगळता सर्व गोलंदाज संघर्ष करताना दिसले. मॅक्सवेलने 10 षटकात 34 धावा देत 2 बळी घेतले. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 3.40 होता आणि त्याने 1 षटक निर्धाव टाकले. तर दुसरीकडे आघाडीचा फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पाने 10 षटकांच्या कोट्यात 70 धावा दिल्या आणि त्याला फक्त 1 बळी घेता आला. स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल मार्श महागडे ठरले.

Back to top button