दिल्लीचे तख्त राखायला भारतीय संघ सज्ज

दिल्लीचे तख्त राखायला भारतीय संघ सज्ज
Published on
Updated on

विश्वचषकाच्या मोहिमेत भारतीय संघ चेन्नईची मोहीम फत्ते करून दिल्लीला अफगाणी फौजेविरुद्ध लढायला आज तयार झाला आहे. भारताला लुटणार्‍या लोधी, अहमद शाह अब्दाली ते गझनीचा मेहमूद यांच्यामुळे दिल्लीच्या तख्ताला अफगाण आक्रमण नवे नाही; पण आज अरुण जेटली मैदानाच्या लढाईत रोहित शर्माचे शिलेदार हशमतुल्ला शाहिदीच्या सैन्याला भारी पडतील, असेच वाटते. कुठच्याही मोठ्या स्पर्धेत पहिला सामना जिंकणे मनोबलासाठी गरजेचे असते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघड परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडून आपण ते साधले आहे. याउलट अफगाणिस्तान बांगला देश विरुद्ध मोठा पराभव स्वीकारून दिल्लीला पोहोचले आहेत.

भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळाला असला, तरी काही प्रमुख गोष्टींची दुरुस्ती करायची आहे, त्यातील एक म्हणजे नेट रनरेट. ऑस्ट्रेलियाचे 200 धावांचे आव्हान गाठायला आपण सुरुवातीच्या हलाखीच्या परिस्थितीने 42 षटके घेतल्याने आपला नेट रनरेट 0.883 आहे. अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवणे गृहीत धरता येत नसले, तरी विजय हवाच आहे आणि मोठ्या फरकाने हवा आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी ही कायमच फलंदाजीला पोषक राहिली आहे. इथल्या सीमारेषा जवळ आहेत, आऊटफिल्ड वेगवान आहे. द. आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध धावांची लयलूट केली. आजही खेळपट्टी फलंदाजीलाच पोषक असेल आणि त्याचा फायदा भारताने घेतला पाहिजे. दुसरीकडे पहिला सामना हरण्याबरोबरच अफगाणिस्तानलाही नेट रनरेट वाढवायचा असेल. कारण, आतापर्यंत या स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तानचेच सामने कमी धावांचे झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध जो संघ आपण उतरवला त्यात फलंदाजीच्या क्रमात तरी बदल संभवत नाही. सामन्याआधी पत्रकार परिषदेत फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडने ईशान किशनच्या भूमिकेबद्दल अथवा सूर्यकुमारच्या संधीबद्दल बोलताना संघ बदलाचा कुठचा संकेत दिला नाही. तेव्हा ईशान किशन आणि श्रेयस अय्यर पहिल्या सामन्यात जरी अपयशी झाले, तरी संघात स्थान राखून असतील. शुभमन गिलला नुकताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे; पण तो अजून चेन्नईलाच हॉटेलात आहे. शनिवारच्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी तो फिट होण्याची आशा सर्वांनाच असेल; पण तो दुखापतीतून बरा होत नसून आजारपणातून बरा होत आहे. डेंग्यूमधून जो अशक्तपणा येतो त्यातून तीन दिवसांत बरे होऊन मैदान गाठणे हा फक्त आशावादच वाटतो. यासाठीच ईशान किशनला पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी आजचा सामनाही उत्तम तयारी आहे.

अफगाणिस्तानचे जलदगती गोलंदाज रहमान आणि फारुकी यांना पहिल्या पॉवरप्लेमध्ये भारतीय फलंदाजांना जखडून ठेवणे गरजेचे आहे. हे जमले तरच त्यांच्या फिरकी गोलंदाजांना आक्रमक गोलंदाजी करता येईल. कारण, हा सामना अफगाणिस्तानच्या फिरकी विरुद्ध भारताची फलंदाजी यांच्यात आहे. याआधी दोन्ही संघ विश्वचषकात गेल्या खेपेला इंग्लडमध्ये साऊथॅम्प्टनला भिडले होते. अफगाणिस्तानच्या मार्‍याविरुद्ध भारताला जेमतेम 228 धावा काढता आल्या होत्या आणि भारत फक्त 11 धावांनी हा सामना जिंकला होता. अफगाणिस्तानची फलंदाजी अजूनही कमकुवत आहे. झद्रान, गुरबाज, शाहिदी यांच्यावरच फलंदाजी प्रामुख्याने अवलंबून आहे. त्याला टेकू मिळतो तो रशीद खान, रहमत शाह आणि नबीच्या अष्टपैलूपणाचा. भारताच्या संतुलित गोलंदाजीविरुद्ध अफगाणिस्तानला धावा जमवणे सोपे नाही. भारत गोलंदाजीच्या पर्यायातून एखादा फिरकी गोलंदाज कमी करून शार्दूल ठाकूर किंवा शमीला खेळवू शकतात. तसे झाले तर अश्विनवरच गदा येईल, असे वाटते.

अफगाणिस्तानच्या द़ृष्टीने हा मोठा सामना आहे. बांगला देशविरुद्ध त्यांना विजयाच्या संधीची अपेक्षा तरी ठेवता येत होती; पण भारताशी भारतात खेळायचे हे त्यांना मोठे आव्हान आहे. विश्वचषकात सलग दुसरा सामना गमावणे हे मनोबल खच्ची करणारे असेल. त्यातून त्यांचा पुढचा सामना बलाढ्य इंग्लंडशी आहे. तेव्हा या सामन्यात त्यांना उत्तम प्रदर्शन करायचे असेल, तर त्यांनी एकच मंत्र जपला पाहिजे, तो म्हणजे मुक्तपणे खेळणे. जेव्हा काहीच गमवायचे नसते तेव्हा बेधडक खेळणे हा एकच पर्याय असतो आणि तो त्यांनी वापरला पाहिजे. अरुण जेटली स्टेडियमवर भारताने गेल्या 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि एक पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे भारताचे हे सामना हक्काने जिंकायचे मैदान आहे. दिल्लीत आता संध्याकाळी अंधार सहा वाजताच पडायला लागला आहे. दुसर्‍या डावात दव मैदानात असणार आहे, तेव्हा दुसर्‍या डावात गोलंदाजी करणार्‍या संघाला या अडचणींचा सामना करावा लागणार. भारताचा संघ हा परिपूर्ण आहे, तर अफगाणिस्तानचा संघ हा एकही मोजक्याच खेळाडूंवर अवलंबून आहे. खेळपट्टी, हवामान, नाणेफेकीचा कौल काहीही असला, तरी भारताचेच पारडे जड आहे. भारताला आज अफगाणी फौजेला नमवून आपल्या दुसर्‍या विजयासाठी आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या तयारीसाठी उत्तम संधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news