ICC World Cup : पाकिस्तानला गोलंदाजांनी वाचवले, नेदरलँड्सची झुंज अपयशी! | पुढारी

ICC World Cup : पाकिस्तानला गोलंदाजांनी वाचवले, नेदरलँड्सची झुंज अपयशी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC World Cup : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी पाकिस्तानने नेदरलँड संघाचा 81 धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने केवळ एक सामान्य धावसंख्या उभारली होती, परंतु गोलंदाजांच्या बळावर हा सामना जिंकण्यात पाकला यश आले. नेदरलँड्सचा खेळाडू बास डी लीडेने आपल्या अष्टपैलू कामगिरीने आपली छाप सोडली.

38 धावांत पाकिस्तानने गमावल्या 3 विकेट

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 49 षटकात 10 गडी गमावून 286 धावा केल्या. त्यांच्या डावाची सुरुवात खराब झाली. चौथ्याच षटकात फखर जमान (12) याच्या रूपाने मोठा धक्का बसला. यावेळी संघाची धावसख्या 15 होती. त्यांची विकेट पडल्यानंतर इमाम उल हक आणि कर्णधार बाबर आझमही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. दरम्यान, इमामने 15 धावा केल्या तर बाबरला केवळ 5 धावा करता आल्या. 38 धावांपर्यंत पाकिस्तानने 3 विकेट गमावल्या होत्या.

रिझवान-शकीलने पाकला तारले

कठीण काळात फलंदाजीसाठी आलेला यष्टिरक्षक फलंदाज रिझवानने संयमी फलंदाजी केली. त्याला दुसऱ्या टोकाकडून तरुण शकीलची चांगली साथ मिळाली. या जोडीने 5व्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली आणि संघाला चांगल्या धावसंख्येकडे नेले. रिझवानने वनडे कारकिर्दीतील 13वे अर्धशतक झळकावले. दुसरीकडे, शकीलनेही आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. दोघेही वैयक्तीक 68-68 धावा करून बाद झाले. 188 धावांवर पाकिस्तानने ची सहावी विकेट गमावली होती. त्यामुळे टीम चांगलीच अडचणीत सापडली. अशा स्थितीत शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी खालच्या फळीत उपयुक्त खेळी केली आणि संघाची धावसंख्या अडीचशेच्या पुढे नेली. शादाब 34 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. तर 43 चेंडूत 39 धावा करून नवाज धावबाद झाला.

बास डी लीडेचा भेदक मारा

नेदरलँडने आपले 8 गोलंदाज वापरले. पण यात बास डी लीडे हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 9 षटकात 62 धावा देत 4 बळी घेतले. तर कॉलिन अकरमनला 2, लोगान व्हॅन विकला आणि आर्यन दत्तला 1-1 बळी घेण्यात यश आले.

धावांचा पाठलाग करताना नेदरलँडची सुरुवात खराब

डच संघाची सुरुवात खास राहिली नाही आणि 28 धावांवर मॅक्स ओडौडच्या (5) रूपाने पहिला धक्का बसला. यानंतर 50 धावांच्या स्कोअरवर दुसरा धक्का कॉलिन अकरमनच्या (17) रूपाने बसला. मात्र, यानंतर लीडे आणि विक्रमजीत सिंग यांनी जबाबदारी स्वीकारली आणि डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 76 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली. ही जोडी तुटल्याबरोबर नेदरलँड्सची फलंदाजी गडगडली आणि त्यांनी काही अंतराने विकेट्स गमावल्या.

विक्रमजीतचे 5वे अर्धशतक

सलामीवीर विक्रमजीतने या सामन्यात शानदार खेळी करत अर्धशतक झळकावले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे 5वे अर्धशतक होते. 77.61 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने आपल्या डावात 67 चेंडूत 52 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. 5 अर्धशतकांसह त्याच्या नावावर 1 शतक आहे. एकदिवसीय क्रिकेटमधली त्याची सर्वोच्च धावसंख्या 110 धावा आहे.

लीडेची अष्टपैलू कामगिरी

नेदरलँड्सच्या वतीने लीडेने प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत अष्टपैलू कामगिरी केली. त्याने पाकिस्तानच्या डावात दमदार गोलंदाजी करत रिझवान (68), इफ्तिखार अहमद (9), शादाब खान (32) आणि हसन अली (0) यांचे महत्त्वाचे बळी घेतले. यानंतर त्याने फलंदाजीतही हात दाखवत शानदार अर्धशतक (68) झळकावले. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 शानदार षटकार मारले.सलग 2 सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 4 पेक्षा जास्त विकेट घेणारा लीडे हा एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे. मागच्या सामन्यात त्याने स्कॉटलंडविरुद्ध 123 धावा केल्या होत्या आणि 52 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या.

सामन्यात पाकिस्तानची गोलंदाजी कशी होती?

या सामन्यात पाकिस्तान संघाची गोलंदाजी संमिश्र होती. रौफने 3 तर हसन अलीने 2 बळी घेतले. त्यांच्याशिवाय शाहीन शाह आफ्रिदी, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज आणि शादाब खान यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. हसनने संघाला पहिले यश लवकर मिळवून दिले, मात्र त्यानंतर गोलंदाजांना विकेटसाठी झगडावे लागले. मात्र, अखेर गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत संघाला विजय मिळवून दिला.

Back to top button