World Cup 2023 : वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात स्टेडियम रिकामे | पुढारी

World Cup 2023 : वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात स्टेडियम रिकामे

अहमदाबाद, वृत्तसंस्था : आयसीसी वन डे वर्ल्डकपचा (World Cup 2023) 13 वा हंगाम गुरुवारपासून भारतात सुरू झाला. जगातील सर्वात मोठे स्टेडियम, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना संपला. मात्र, या सामन्यातील सुरुवातीची द़ृश्य पाहून आयसीसी आणि बीसीसीआयची तिकीट विक्रीत काही तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

वन डे क्रिकेटमधील दोन दिग्गज संघ आज वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात आमनेसामने आले होते. तरीदेखील चाहत्यांनी या सामन्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. एक लाख आसन क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील जवळपास सर्व सीटस् रिकाम्या पडल्या होत्या. रणजी ट्रॉफीच्या सामन्यातदेखील प्रेक्षकांची याच्यापेक्षा जास्त गर्दी असते. यामुळे बीसीसीआय आणि आयसीसी या दोघांसाठी ही शरमेची बाब झाली आहे. बीसीसीआय आणि आयसीसीने तिकीट विक्रीत गोंधळ घातला होता.

इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील पहिल्याच सामन्यात डेव्हॉन कॉनवेचे दिडशतक (152) आणि रचिन रवींद्रचे शतक (123) तसेच या दोघांनी केलेल्या 273 धावांची अभेद्य, विक्रमी भागीदारीच्या जोरावर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर 9 विकेटसनी विजय मिळवला. (World Cup 2023)

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना रंगला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्‍या इंग्लंड संघाने 50 षटकांत नऊ गडी गमावून 282 धावा केल्या. त्याने न्यूझीलंडला 283 धावांचे लक्ष्य दिले आहे.

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने सर्वाधिक 77 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 50 धावांचा टप्पा गाठता आला नाही. कर्णधार जोस बटलरने 43 धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने 33, हॅरी ब्रुकने 25 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 20 धावांचे योगदान दिले. आदिल रशीदने नाबाद 15, डेव्हिड मलान आणि सॅम कुरेनने 14-14, मार्क वुडने नाबाद 13, मोईन अली आणि ख्रिस वोक्सने 11-11 धावा केल्या.

Back to top button