Asian Games 2023 : भारताला महिला कुस्तीत कांस्यपदक! अंतीम पंघालने मैदान मारले | पुढारी

Asian Games 2023 : भारताला महिला कुस्तीत कांस्यपदक! अंतीम पंघालने मैदान मारले

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज (5 ऑक्टोबर) 12 वा दिवस आहे. या स्पर्धेत भारताला पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, सातव्या दिवशी पाच, आठव्या दिवशी 15 नवव्या दिवशी सात, दहाव्या दिवशी नऊ आणि 11व्या दिवशी 12 पदके मिळाली आहेत. आज (5 ऑक्टोबर) भारताला तिरंदाजीमध्ये 2 सुवर्ण आणि स्क्वॉशमध्ये एक सुवर्ण, 1 रौप्यपदक तर महिलांच्या कुस्ती स्पर्धेत एक कांस्यपदक मिळाले आहे. सध्या भारताच्या खात्यात एकूण 86 पदके जमा झाली आहेत. यात 21 सुवर्ण, 32 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश आहे.

महिला कुस्तीत कांस्यपदक

अंतीम पंघालने महिलांच्या 53 किलो फ्रीस्टाइलमध्ये कांस्यपदक पटकावले. तिने या लढतीत मंगोलियाच्या बॅट-ओचिर बोलोर्तुया हिला आस्मान दाखवले. खरेत अंतिमला शेवटच्या क्षणी एशियन गेम्सचे तिकिट मिळाले होते. या संधीचा पुरेपूर फायदा उचलत तिने चमकदार कामगिरी केली आहे.

स्क्वॉशच्या पुरुष एकेरी रौप्यपदक

सौरव घोषालला स्क्वॉशमधील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मलेशियाच्या एनानने त्याचा 9-11, 11-9, 11-5, 11-6 असा पराभव केला. असे असले तरी 2006 पासून सलग 5 वैयक्तिक एशियाड पदके जिंकणारा सौरव पहिला स्क्वॉशपटू ठरला आहे. भारत 21 सुवर्ण पदकांसह पदकतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे.

तिरंदाजीत आणखी एक सुवर्ण

कंपाऊंड पुरुष सांघिक तिरंदाजीमध्ये भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. ओजस देवतळे, अभिषेक वर्मा, जावकर प्रथमेश समाधान यांच्या संघाने दक्षिण कोरियाचा 235-230 अशा फरकाने पराभव केला. स्पर्धेच्या 12 व्या दिवसातील भारताचे हे सलग तिसरे सुवर्ण पदक ठरले.

दीपिका-हरिंदरने सुवर्णपदक जिंकले

‘स्क्वॉश’मध्ये भारताच्या दीपिका पल्लिकल, हरिंदरपाल संधू जोडीने सुवर्ण पदकाची कमाई केली. स्क्वॉश क्रीडा प्रकारात पुरूष संघाने सुवर्ण पदक पटकावल्यानंतर मिश्र दुहेरीतही भारताने सुवर्ण पदकाला गवसणी घालत नवा इतिहास रचला आहे.

भारताच्या मुलींचा तिरंदाजीत सुवर्णवेध, ज्योती, आदिती, प्रनीतला सुवर्ण

भारताने तिरंदाजीत महिला कंपाऊंड सांघिकमध्ये सुवर्णवेध घेतला. ज्योती वेण्णम, आदिती स्वामी आणि प्रनीत कौर यांनी चायनीज तैपेईच्या महिला संघाला 230-228 अशी मात देत सुवर्णपदक जिंकले. ज्योती वेन्नमने बुधवारी मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. आता महिलांच्या कंपाऊंड सांघिकमध्येही तिने सुवर्ण कामगिरी केली.

Back to top button