टी-20 विश्वचषक खेळलेल्या ७ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यातून वगळले, रोहित शर्मा कर्णधार - पुढारी

टी-20 विश्वचषक खेळलेल्या ७ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यातून वगळले, रोहित शर्मा कर्णधार

मुंबई ; वृत्तसंस्था :

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. यामध्ये अपेक्षेप्रमाणेे रोहित शर्मा याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून, त्यांच्याजागी ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल आणि आवेश खान या आयपीएल स्टारना संघात संधी मिळाली आहे.

विश्‍वचषक स्पर्धेनंतर न्यूझीलंडचा संघ थेट भारतात येणार आहे. या दौर्‍यात ते 3 टी-20 सामने तर दोन कसोटी सामने खेळणार आहेत. यातील टी-20 मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. विराट कोहली याने टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या जागी रोहित शर्माची निवड नक्‍की मानली जात होती. अपेक्षेप्रमाणे त्याला ही जबाबदारी देण्यात आली तर लोकेश राहुल हा टी-20 चा उपकर्णधार असेल.

या संघात आयपीएल 2021 चा हंगाम गाजवणार्‍या स्टार खेळाडूंना राष्ट्रीय संघाचे दार उघडले आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल आणि आवेश खान यांचा समावेश आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात चेन्‍नई सुपर किंग्जच्या ऋतुराजने ‘ऑरेंज कॅप’ तर आरसीबीच्या हर्षल पटेलने ‘पर्पल कॅप’ पटकावली होती. केकेआरकडून व्यंकटेशने आक्रमक डावखुरा सलामी फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज अशी अष्टपैलू कामगिरी केली होती. तर दिल्ली कॅपिटल्सच्या आवेश खानने वेगवान गोलंदाज म्हणून नाव कमावले.

या मालिकेसाठी विश्‍वचषक संघातील विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती व रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे.

टी-20 साठी निवडलेला भारतीय संघ असा : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर. अश्‍विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्‍वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

भारतीय ‘अ’ संघाची घोषणा

राष्ट्रीय निवड समितीने टी-20 संघाबरोबरच दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय ‘अ’ संघाचीही घोषणा केली. प्रियांक पांचाळकडे संघाचे नेतृत्व असेल. यामध्ये जम्मू-काश्मीरचा स्पीडस्टार उमरान मलिकची निवड लक्षवेधी आहे. हा संघ तेथे 3 चार दिवसीय सामने खेळणार आहे.

संघ असा : प्रियांक पांचाळ (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्‍वरन, देवदत्त पडिक्‍कल, सर्फराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव (यष्टिरक्षक), के. गौतम, राहुल चहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी, उमरान मलिक, ईशान पोरेल, अर्झान नागवासवाला.

Back to top button