Asian Games 2023 : कबड्डीमध्ये भारताचे पदक निश्चित! महिला संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश | पुढारी

Asian Games 2023 : कबड्डीमध्ये भारताचे पदक निश्चित! महिला संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. बुधवारी अ गटातील तिसर्‍या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने थायलंडचा 54-22 अशा गुण फरकाने पराभव करून उपांत्य फेरीत गाठली आहे. कारण यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना कांस्यपदक देण्यात येणार आहे. उपांत्य फेरीचा सामना शुक्रवारी खेळला जाईल, जिथे भारतीय संघ इराण किंवा बांगलादेश यापैकी एकाशी भिडणार आहे. गतविजेता इराण ब गटात अव्वल तर नेपाळ दुसऱ्या स्थानावर आहे. दिवसअखेरीस दक्षिण कोरिया आणि चायनीज तैपेई यांच्यातील सामन्यानंतर अ गटातील गुणतालिकेतील अंतिम स्थान निश्चित केले जाईल.

थायलंडविरुद्ध भारताच्या पुष्पा राणा, निधी शर्मा आणि पूजा हातवाला यांनी जबरदस्त चढाई करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारतीय संघाने पहिल्या 10 मिनिटांत 18-5 अशी भक्कम आघाडी घेतली. या काळात भारतीय संघाने थायलंडलाही एकदा ऑलआऊट केले. भारतीय महिलांनी सामन्यात सुरुवातीची गती कायम राखली आणि थायलंडवर दबाव ठेवला. पूर्वार्धाच्या अखेरीस टीम इंडियाने 32-9 अशी मोठी आघाडी मिळवली होती. उत्तरार्धात थायलंडच्या संघाने काही प्रयत्न केले आणि 13 गुण मिळवले, परंतु भारतीय संघाच्या भक्कम बचाव आणि चढाईच्या विरोधात ते झुंजताना दिसले. शेवटी त्यांना 54-22 असा पराभव पत्करावा लागला.

तत्पूर्वी, भारतीय महिला कबड्डी संघाने पहिल्या सामन्यात चायनीज तैपेईविरुद्ध 34-34 अशी बरोबरी साधल्यानंतर दुसऱ्या सामन्यात द. कोरियाचा 56-23 असा पराभव केला.

Back to top button