World Cup 2023 : कर्णधार रोहित शर्मा मिळवून देणार का विश्वविजेतेपद? | पुढारी

World Cup 2023 : कर्णधार रोहित शर्मा मिळवून देणार का विश्वविजेतेपद?

भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून यंदाचा वन-डे वर्ल्डकप (World Cup 2023) जिंकण्याची अपेक्षा ठेवली जात आहे. भारतीय संघ तिन्ही क्रिकेट फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यात वर्ल्डकप हा मायदेशात होत असल्याने रोहितकडून जास्तच अपेक्षा ठेवण्यात येत आहेत.

2011 मध्ये वन-डे वर्ल्डकप भारतात झाला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 28 वर्षांनी वर्ल्डकपवर आपले नाव कोरले होते. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एका तपानंतर भारतात वर्ल्डकप खेळत आहे. भारतीय संघाने आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका खिशात घालत आपली वर्ल्डकपची तयारी पूर्ण झाल्याचे संकेत दिले होते. भारतीय संघासोबतच कर्णधार रोहित शर्मानेदेखील दमदार कामगिरी केली होती. रोहित शर्माचा हा तिसरा वन-डे वर्ल्डकप असून, हा वर्ल्डकप त्याचा शेवटचा वर्ल्डकपदेखील ठरण्याची दाट शक्यता आहे.

रोहित शर्माची 2015 च्या वर्ल्डकपमधील कामगिरी (World Cup 2023)

रोहित शर्माची 2011 चा वर्ल्डकप खेळण्याची संधी हुकली होती. मात्र, त्याचा 2015 च्या वर्ल्डकप संघात समावेश करण्यात आला होता. त्याने या वर्ल्डकपमध्ये 8 सामन्यांत 47.14 च्या सरासरीने 330 धावा केल्या होत्या. यात एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. त्याने 91.66 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या.

2019 च्या वर्ल्डकपमध्ये रोहितचा धमाका

आपल्या पहिल्या वर्ल्डकपमध्ये समाधानकारक कामगिरी केल्यानंतर रोहितने दुसर्‍या 2019 च्या वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी केली. त्याने 9 सामन्यांत तब्बल 81 च्या सरासरीने 648 धावा ठोकल्या. त्याने तब्बल 5 शतकी आणि एक अर्धशतकी खेळी केली होती. यात 140 धावांच्या सर्वात मोठ्या खेळीचादेखील समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट 98.33 इतका होता.

2023 मध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 16 वन-डे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 50.61 च्या सरासरीने 658 धावा केल्या. यात एका शतकी खेळीचा, तर 6 अर्धशतकी खेळींचा समावेश आहे.

वन-डेचा कर्णधार म्हणून रोहितचे बॅटिंग रेकॉर्ड (World Cup 2023)

भारतीय वन-डे संघाचा कर्णधार रोहित शर्माने 34 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 55.76 च्या सरासरीने 1,450 धावा केल्या असून, नाबाद 208 धावा ही त्याची सर्वोकृष्ट खेळी ठरली. त्याने 105.53 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. कर्णधार म्हणून रोहितने 3 शतके, तर 11 अर्धशतके ठोकली आहेत.

रोहितच्या नेतृत्वात भारताने 34 पैकी 24 वन-डे सामन्यांत विजय मिळवला असून, 9 सामने गमावले आहेत; तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

चार वर्षांच्या मंथनातून तयार झाला बलाढ्य संघ

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय भारतीय संघ विश्वविजयाची लढाई लढण्यास सज्ज झाला आहे. वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ हा कागदावर तरी बलाढ्य आणि त्या त्या जागेसाठी सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा भरणा असलेला संघ दिसत आहे; पण हा संघ सहजासहजी तयार झालेला नाही. त्यासाठी 2019 च्या वर्ल्डकपनंतर तयारी सुरू होती. सुमारे चार वर्षांच्या मंथनातून हा संघ तयार झाला आहे.

भारतीय संघाला वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सराव करण्याची संधी मिळाली नाही. भारताचे दोन्ही सराव सामने पावसामुळे रद्द झाले. आता भारतीय संघ थेट रविवारी ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी चेन्नईच्या एम. चिदम्बरम स्टेडियमवर उतरणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तान व नंतर पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला होणार आहे. भारतीय संघाने नुकताच आशिया चषक उंचावला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका 2-1 अशी जिंकली. त्यामुळे भारताकडून अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत.

भारताला 2013 नंतर आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. 2011 मध्ये भारताने शेवटचा वन-डे वर्ल्डकप उंचावला होता आणि तोही घरच्या मैदानावर. आता 12 वर्षांनी पुन्हा घरच्या मैदानावर वर्ल्डकप जिंकण्याची भारताला संधी आहे. शुभमन गिल व रोहित शर्मा ही भारताची सलामीची जोडी असणार आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल हे फॉर्मात आहेत आणि त्यांच्यामुळे मधली फळी भक्कम झाली आहे. हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर ही अष्टपैलू खेळाडूंची फौज भारताच्या संघात आहे. आर. अश्विन याची सरप्राईज एन्ट्री झाली. अक्षर पटेलला दुखापत झाल्याने अश्विनला बोलावण्यात आले आणि आता त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. कुलदीप यादव त्याच्या मदतीला आहेच. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज हा जलदगती मारा आहेच. ईशान किशन व सूर्यकुमार यादवसारखे तगडे खेळाडू बॅकअपला आहेत. त्यामुळे संघ बलाढ्य भासत आहे.

भारताचे सामने (वेळ दुपारी 2 पासून)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 8 ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान : 11 ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान : 14 ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगला देश : 19 ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड : 22 ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड : 29 ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका : 2 नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 5 नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँडस् : 12 नोव्हेंबर, बंगळूर

Back to top button