Asian Games Long Jump : एन्सी सोजनची ‘सिल्वर उडी’! महिलांच्या ‘लाँग जंप’मध्ये भारताला रौप्यपदक

Asian Games Long Jump : एन्सी सोजनची ‘सिल्वर उडी’! महिलांच्या ‘लाँग जंप’मध्ये भारताला रौप्यपदक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games Long Jump : भारतीय महिला लांब उडीपटू एन्सी सोजनने आशियाई क्रीडा स्पर्धेत 6.63 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह रौप्यपदक जिंकले. यासह भारताच्या पदकांची संख्या 59 झाली असून यात रौप्यपदकांची संख्या 23 पर्यंत पोहचली आहे.

महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य आणि कांस्यपदक

भारताचा 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे याने हाँगझोऊ एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) रविवारी सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला होता. त्यानंतर सोमवारी याच स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी मैदान गाजवले. पारूल चौधरीने (वेळ : 9 मिनिटे 27.63 सेकंद) रौप्यपदक तर प्रिती लांबा ( वेळ : 9 मिनिटे 43.32 सेकंद) हिने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

भारत पदक क्रमवारीत चौथ्या स्थानावर

भारत 13 सुवर्ण, 22 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह पदक क्रमवारीत चौथ्या स्थानावर कायम आहे. 'यंदा 100 मेडल पार' हे लक्ष्य घेऊन उतरलेल्या भारतीय खेळाडूंनी चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. आज 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 9व्या दिवसाची सुरुवात 3 कांस्य पदकांनी झाली. स्पीड स्केटिंगमध्ये प्रथम भारतीय महिला संघाने कांस्यपदक जिंकले, त्यानंतर पुरुष संघानेही कांस्यपदक जिंकले. यानंतर महिला दुहेरीत टेबल टेनिसमध्येही कांस्यपदक मिळाले. टेबल टेनिसमध्ये सुतीर्थ आणि अहिका मुखर्जी या जोडीला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय जोडीचा कोरियाकडून 4-3 असा पराभव झाला.

स्केटिंगमध्ये 3000 मीटर रिले शर्यतीत कांस्यपदक

संजना भातुला, कार्तिक जगदीश्‍वरन, हिरल साधू आणि आरती कस्तुरी यांच्या महिला संघाने रोलर स्केटिंगमध्ये 3000 मीटर रिले शर्यतीत कांस्यपदक जिंकले. तर पुरुषांच्या 3000 मीटर स्पीड स्केटिंगमध्ये भारताच्या आर्यनपाल, आनंदकुमार, सिद्धांत आणि विक्रम यांच्या संघाने तिसरे स्थान पटकावले आणि कांस्यपदक जिंकले.

पुरुष हॉकीमधील गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर महिलांच्या कबड्डीमध्ये भारतीय महिला संघाचा चायनीज तैपेईविरुद्धचा सामना बरोबरीत राहिला. बॅडमिंटन एकेरीत किदाम्बी श्रीकांत आणि दुहेरीत सात्विक साईराज, रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने विजयासह पुढील फेरी गाठली आहे. मिश्र दुहेरी बॅडमिंटनमध्ये कृष्णा प्रसाद आणि तनिषा क्रास्टो या जोडीने मकाऊ जोडीचा पराभव करत अंतिम 16 मध्ये प्रवेश केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news