19th Asian Games | १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीत सरबज्योत सिंग, दिव्या टीएस यांना रौप्यपदक | पुढारी

19th Asian Games | १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीत सरबज्योत सिंग, दिव्या टीएस यांना रौप्यपदक

पुढारी ऑनलाईन : भारतीय नेमबाज सरबज्योत सिंग आणि दिव्या टीएस यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नेमबाजीतील भारताची पदकांची संख्या १९ झाली आहे. यात ६ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. तर आतापर्यंत भारताने विविध क्रीडा प्रकारात ३४ पदके मिळवली आहेत. (19th Asian Games)

भारताच्या सरबज्योत सिंग आणि दिव्या टीएस यांना शनिवारी येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरीच्या सांघिक प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत स्कोअर १६-१४ असा राहिला. या प्रकारात चीनचे नेमबाज झांग बोवेन आणि जियांग रॅनक्सिन यांना सुवर्णपदक मिळाले.

संबंधित बातम्या 

आशिया क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये शुक्रवारी भारताच्या नेमबाजांनी पदकांवर निशाणा साधताना भारताच्या बॅगेत आणखी काही पदकांची भर टाकली होती. ५० मीटर रायफल ३ पोझिशन पुरुष स्पर्धेत सुवर्णपदक, तर सांघिक आणि १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक देशाला मिळाल्यानंतर तीन रौप्यपदकांवरही नेमबाजांनी निशाणा साधला होता.

शुक्रवारी ५० मीटर रायफल नेमबाजीत पुरुषांच्या संघाने भारताला सातवे सुवर्णपदक मिळवून दिले. ऐश्वर्यप्रताप सिंग तोमर, स्वप्निल कुसाळे आणि अखिल शेरॉन या त्रिकुटाने शूटिंगमध्ये कमाल केली. तिघांनी मिळून ५० मीटर रायफल ३ पोझिशन पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिघांनी मिळून १७६९ गुण मिळवले. चीनच्या लिनशु, हाओ आणि जिया मिंग या जोडीला रौप्यपदक मिळाले. त्याचवेळी कोरियाच्या खेळाडूंनी कांस्यपदक पटकावले.

भारताच्या ऐश्वर्यप्रताप सिंग तोमरने पुरुष ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. ऐश्वर्यने आतापर्यंत एशियन गेम्समध्ये चार पदके पटकावली आहेत. त्याने २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य जिंकले आहे.

एशियन गेम्स २०२३ मध्ये ५० मीटर एअर रायफल ३ पोझिशन शूटिंग वैयक्तिक स्पर्धेत महाराष्ट्राचा स्वप्निल कुसळे आघाडीवर होता, तो ३५ शॉटस्पर्यंत गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. मात्र, त्यानंतर त्याची घसरण होऊ लागली अन् ऐश्वर्यप्रताप सिंग तोमर हळूहळू गुणतालिकेत वरती सरकत होता. अखेर ४३ व्या शॉटस्नंतर ऐश्वर्यप्रताप सिंग तोमरने ४३९.७ गुण घेत दुसरे स्थान पटकावले अन् रौप्यपदक जिंकले. कोल्हापूरचा स्वप्निल कुसळे ४३८.९ गुण घेत चौथ्या स्थानावर राहिला. त्याचे कांस्यपदक अवघ्या ०.१ गुणाने हुकले.

१० मीटर पिस्तूल प्रकारात पलकला सुवर्ण, ईशा सिंगला रौप्यपदक

नेमबाजीत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत १७ वर्षीय पलक गुलियाला सुवर्णपदक आणि १८ वर्षीय ईशा सिंगला रौप्यपदक मिळाले. सुवर्णपदक विजेत्या पलकने आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम रचला. दरम्यान, ईशा सिंगचे हे चौथे पदक आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताने सुवर्ण आणि रौप्य जिंकले. तर पाकिस्तानच्या किश्माला तलतने कांस्यपदक मिळाले. पलकचा २४२.१ आणि ईशाचा २३९.७ स्कोअर राहिला. तिघींनी आशियाई क्रीडा स्पर्धेतही विक्रम केला.

हे ही वाचा :

Back to top button