पुढारी ऑनलाईन डेस्क : Kane Williamson Ruled Out : आयसीसी वनडे वर्ल्डकप (ICC World Cup) सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार केन विल्यमसन या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात भाग घेऊ शकणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टेड यांनी सांगितले की, विल्यमसन हा गुडघ्याच्या दुखापतीतून पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. पण तो इंग्लंडविरुद्धचा वर्ल्डकपचा उद्घाटन सामना खेळणार नाही. पण तो तो शुक्रवारी हैदराबादमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात फलंदाज म्हणून खेळणार असून सोमवारी तिरुवनंतपुरममध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करणार आहे, अशी त्यांनी माहिती दिली.
स्टीड म्हणाले, 'आम्ही केन विल्यम्सनच्या पुनरागमनासाठी सुरुवातीपासूनच दीर्घकालीन योजना आखत आहोत. त्याचे पुनर्वसन चांगले झाले आहे आणि आता फक्त त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामाचा भार व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रश्न आहे. आम्ही दररोज त्याच्या फिटनेसचा मागोवा घेत राहू आणि जोपर्यंत तो पूर्णपणे फिट होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणताही दबाव टाकणार नाही. विल्यमसनने 9 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड्स विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या विश्वचषक सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यावर लक्ष केंद्रित केले आहे,' असाही खुलासा त्यांनी केला.
आयपीएलदरम्यान विल्यमसनच्या गुडघ्याला गंभार दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर एसीएल शस्त्रक्रिया करावी लागली होती. तो बरा होत आहे. तो सराव सामने खेळताना दिसेल पण वर्ल्डकपच्या उद्घाटन सामन्यात मैदानात दिसणार नाहीय. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथमकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तो दोन सराव सामन्यांसह इंग्लंडविरुद्धच्या मुख्य सामन्यात संघाचे नेतृत्व करणार आहे. (ICC World Cup)
विल्यमसनने वनडे वर्ल्डकपमध्ये (ICC World Cup) 23 सामने खेळले असून 56.93 च्या सरासरीने आणि 78.33 च्या स्ट्राइक रेटने 911 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने 2 शतके आणि 3 अर्धशतके फटकावली आहेत. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये त्याला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरविण्यात आले होते.