IND vs AUS ODI : ऑस्ट्रेलियाने तिसरी वनडे जिंकली, भारताचा 66 धावांनी पराभव | पुढारी

IND vs AUS ODI : ऑस्ट्रेलियाने तिसरी वनडे जिंकली, भारताचा 66 धावांनी पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वनडे मालिका विजयासह संपुष्टात आणली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा 66 धावांनी पराभव केला. कर्णधार रोहित शर्माने 57 चेंडूंत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. विराट कोहलीने 61 चेंडूत 56 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. तर श्रेयस अय्यरने 48 आणि रवींद्र जडेजाने 35 धावांचे योगदान दिले. या पराभवानंतरही टीम इंडियाने ही मालिका 2-1 अशी जिंकली. भारताने पहिला एकदिवसीय सामना 5 धावांनी आणि दुसरा सामना 99 धावांनी जिंकला होता.

मात्र, प्रथमच वनडे मालिकेत कांगारू संघाविरुद्ध क्लीन स्वीप करण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अधुरेच राहिले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सात गडी गमावून 352 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 49.4 षटकांत 286 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 40 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. तर हेझलवूडने दोन बळी घेतले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने सात गड्यांच्या मोबदल्यात 352 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर (56), मिचेल मार्श (96), स्टीव्ह स्मिथ (74) आणि मार्नस लॅबुशेन (72) या आघाडीच्या चार फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून जसप्रीत बुमराह (81 धावांत तीन बळी) आणि कुलदीप यादव (सहा षटकांत 48 धावांत दोन विकेट) हे यशस्वी गोलंदाज ठरले. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. रोहित आणि वॉशिंग्टन सुंदर (30 चेंडूत 18) यांनी पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. सुंदर 10व्या षटकात बाद झाला. रोहित आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. रोहित 21व्या तर कोहली 27व्या षटकात बाद झाला. ते मॅक्सवेलच्या जाळ्यात अडकले. श्रेयस अय्यर (43 चेंडूत 48, एक चौकार, दोन षटकार) आणि केएल राहुल (30 चेंडूत 26, दोन चौकार) यांनी चौथ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली आणि भारताला 220 च्या पुढे नेले. सूर्यकुमार यादवने (8) निराशा केली. तो अवघ्या आठ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मॅक्सवेलने 39व्या षटकात अय्यरला बोल्ड केले. यानंतर भारताची स्थिती सतत खराब होत गेली. रवींद्र जडेजा (36 चेंडूत 35, तीन चौकार, एक षटकार) याला दुसऱ्या टोकाला साथ मिळाली नाही. जोश हेझलवूडने दोन तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, कॅमरून ग्रीन आणि तन्वीर संघाने प्रत्येकी एक विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Back to top button