Asian Games 2023 : भारतीय हॉकी संघाची दमदार सुरुवात, उझबेकिस्तानचा 16-0 ने पराभव | पुढारी

Asian Games 2023 : भारतीय हॉकी संघाची दमदार सुरुवात, उझबेकिस्तानचा 16-0 ने पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने धमाकेदार सुरुवात केली आहे. ग्रुप ए च्या सामन्यात आज भारतीय संघाने उझबेकिस्तानला सळो की पळो करून सोडले आणि 16-0 ने सर्वात मोठा विजय मिळवला.

तीन खेळाडूंची हॅट्ट्रिक

या सामन्यात भारताच्या तीन खेळाडूंनी हॅट्ट्रिक पूर्ण केली. वरुण कुमार, मनदीप सिंग आणि ललित कुमार उपाध्याय यांनी गोलवर गोल डागून प्रतिस्पर्धी उझबेकिस्तानला अक्षरश: लोळवले. ललितने 4, तर वरुण आणि मनदीपने प्रत्येकी 3 गोल केले. सुखजीत सिंगने दोन तर अभिषेक, समशेर सिंग, अमित रोहिदास, आणि संजय यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला.

एफआयएच क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आणि सुरुवातीपासूनच चेंडूवर आपले नियंत्रण राखले. ललित कुमार उपाध्यायने सामन्याच्या 7व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला. दरम्यान, भारताने आणखी एक गोल करत 2-0 अशी आघाडी घेतली. जेव्हा भारतीय खेळाडू वरुणने आपल्या ड्रॅग फ्लिकचे गोलमध्ये रूपांतर करून गोल संख्या दुप्पट केली.

अशाप्रकारे, पहिल्या क्वार्टरपर्यंत ललित आणि वरुणच्या गोलमुळे भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने आक्रमणाच्या जोरावर उझबेकिस्तानवर दबाव कायम ठेवला. दुसऱ्या क्वार्टरला सुरुवात होऊन दोनच मिनिटे झाली असताना अभिषेकने गोल डागला आणि आघाडी 3-0 वर पोहचवली. पुढच्याच मिनिटाला मनदीप सिंगने गोल आघाडी चौपट केली. सामन्याच्या 24व्या मिनिटाला ललित कुमार उपाध्यायने आणखी एक गोल करत गोलचा पंच लगावला. मनदीप सिंगने 27व्या आणि 28व्या मिनिटाला असे दोन बॅक टू बॅक गोल करत भारताचा स्कोअर 7-0 वर नेला. भारताने पहिल्या हाफपर्यंत ही आघाडी कायम ठेवली. भारताने दुसऱ्या हाफची सुरुवात रोमांचक रीतीने केली, भारतीय खेळाडूंनी सलग दोन गोल केले आणि आघाडी 9-0 वर पोहचवली.

भारतीय पुरुष हॉकी संघाने आपला दबदबा कायम ठेवत उझबेकिस्तानच्या खेळाडूंना संधी दिली नाही. दरम्यान, भारतासाठी अमित रोहिदासने 38व्या मिनिटाला तर सुखजित सिंगने 42व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी वाढवली. वरुण कुमारने गोल करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि 50व्या आणि 52व्या मिनिटाला दोन बॅक टू बॅक गोल केले. दरम्यान, ललित उपाध्यायने आपला वैयक्तीक चौथा गोल नोंदवला. त्यानंतर संजयने 57व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून संघाचा शेवटचा गोल केला. अशा प्रकारे, भारतीय हॉकी संघाने आशियाई खेळ 2023 मध्ये उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव करून शानदार सुरुवात केली.

आता भारताचा दुसरा सामना मंगळवारी 26 सप्टेंबर रोजी सिंगापूर विरुद्ध आहे. यानंतर जपान आणि पाकिस्तानशी सामना करावा लागेल. गटातील शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या संघांना पुढे जाण्याची संधी मिळेल. पहिला सामना दणक्यात जिंकल्याने पुढील लढतींमध्ये भारतीय संघ नक्कीच चांगली करेल असा विश्वास चाहत्यांना आहे. त्यामुळे संघाला पुढील फेरी गाठणे अगदी सोपे होईल.

Back to top button