राहुल, इशानमुळे संजू सॅमसनचे संघातील स्थान हुकले : हरभजन सिंग | पुढारी

राहुल, इशानमुळे संजू सॅमसनचे संघातील स्थान हुकले : हरभजन सिंग

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताकडे के.एल. राहुल आणि इशान किशन हे दोन यष्टिरक्षक आधीच आहेत. दोघेही वर्ल्डकप संघाचा भाग आहेत, त्यामुळे संघात संजू सॅमसनसाठी जागा उरत नाही, असे वक्तव्य भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग याने केेले आहे.

2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान न मिळाल्याने बराच गदारोळ झाला होता. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी बोर्डावर अनेक प्रश्न उपस्थित केले. 22 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संजूची निवड झाली नव्हती, तेव्हा बोर्डावर पक्षपाताचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, भारतीय संघात स्थान न मिळणे हे संजू सॅमसनचे दुर्दैव असल्याचे मत हरभजनने व्यक्त केले.

हरभजन सिंग त्याच्या यू ट्यूब चॅनलवर म्हणाला की, ‘संजू सॅमसनला वगळण्यात आल्याने अनेक चर्चेला उधाण आले. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची सरासरी 55 आहे आणि तरीही तो संघाचा भाग नाही, तर नक्कीच हे विचित्र आहे, पण माझ्या मते संजूची निवड झाली नाही. कारण भारताकडे के.एल. राहुल आणि इशान किशन हे दोन यष्टिरक्षक आधीच आहेत. दोघेही वर्ल्डकप संघाचा भाग आहेत.

भज्जी पुढे म्हणाला, ‘संजूला त्याच्या संधीची वाट पाहावी लागेल. मला माहीत आहे की, कधी कधी ते स्वीकारणे कठीण असते; पण वय त्याच्या बाजूने आहे आणि मी त्याला कठोर परिश्रम करत राहण्याचा आणि वेळ घालवण्याचा सल्ला देईल.’

तो म्हणाला, ‘जर मला के.एल. राहुल आणि संजू सॅमसन यापैकी एकाची निवड करायची असेल, तर मी राहुलला नक्कीच निवडेन, कारण तो 4, 5 क्रमांकावर स्थिरता देतो. सॅमसन हा देखील चांगला खेळाडू आहे; परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की एका संघात तीन यष्टिरक्षक-फलंदाज नसावेत.’

Back to top button