पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup IND vs SL : आशिया कपमधील सुपर-4 टप्प्यातील चौथ्या सामन्यात भारताने दिलेल्या 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. अवघ्या 7.1 षटकात 25 धावांवर त्यांनी 3 विकेट्स गमावल्या.
श्रीलंकेची तिसरी विकेट 25 धावांवर पडली. दिमुथ करुणारत्नेला मोहम्मद सिराजने शुभमन गिलच्या हाती झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत दोन धावा केल्या.
25 धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेला दुसरा धक्का बसला. कुसल मेंडिस 16 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेसाठी आश्चर्यकारक कामगिरी केली, परंतु भारताचे वेगवान गोलंदाज चमकदार कामगिरी करताना दिसले.
सात धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेला पहिला धक्का बसला. पथुम निसांका सात चेंडूत सहा धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला यष्टिरक्षक लोकेश राहुलकडे झेलबाद केले.
तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाचा डाव 49.1 षटकात 213 धावांवर आटोपला. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज श्रीलंकेच्या फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना दिसले. डावखुरा फिरकीपटू दुनिथ वेल्लालागे याने 5 बळी घेतले, तर ऑफस्पिनर चरिथ असलंकाने चार फलंदाजांना माघारी धाडले.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 53 धावा केल्या. रोहितने वनडे कारकिर्दीतील 51 वे अर्धशतक झळकावले. त्याने 10 हजार वनडे धावाही पूर्ण केल्या. रोहितशिवाय केएल राहुलने 39 आणि यष्टीरक्षक इशान किशनने 33 धावांचे योगदान दिले. अक्षर आणि सिराज यांनी शेवटच्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी केली.
पाऊस थांबल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. षटकांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. भारतीय संघाने 9 बाद 197 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. अक्षर आणि सिराजने मिळून भारताची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली. अखेर 49.1 व्या षटकात अक्षर बाद झाला. आणि भारताचा डाव 213 धावांत संपुष्टात आला. याचबरोबर श्रीलंकेला विजयसाठी 214 धावा कराव्या लागतील.
178 धावांवर भारतीय संघाची सातवी विकेट पडली. रवींद्र जडेजा चार धावा करून बाद झाला. चरित असलंकाने त्याला यष्टिरक्षक कुसल मेंडिसकरवी झेलबाद केले.
172 धावांवर भारताची सहावी विकेट पडली. हार्दिक पंड्या 18 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. वेलाल्गेने त्याला यष्टिरक्षक कुसल मेंडिसकरवी झेलबाद केले. या सामन्यातील हा त्याचा शेवटचा चेंडू होता आणि या चेंडूवर विकेट घेत त्याने सामन्यातील पाच बळी पूर्ण केले. वनडेमध्ये पहिल्यांदाच त्याने पाच विकेट घेण्याची किमया केली आहे.
भारताचा निम्मा संघ 170 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. भारताला पाचवा धक्का इशान किशनच्या रूपाने बसला. त्याने 61 चेंडूत 33 धावा केल्या. चरिथ असलंकाच्या चेंडूवर तो वेलल्गेकडे झेल देऊन बाद झाला.
154 धावांच्या स्कोअरवर भारतीय संघाची चौथी विकेट पडली. लोकेश राहुल 44 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. वेलल्गेने त्याला कॉट अँड बोल्ड केले. वेलल्गेची ही चौथी विकेट ठरली.
इशान किशन आणि लोकेश राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. या जोडीने भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. वेलल्गेने सलग तीन षटकांत विकेट घेत भारताला अडचणीत आणले होते. मात्र, यानंतर दोघांनीही सावध फलंदाजी केली.
91 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. रोहित शर्मा अर्धशतक झळकावून बाद झाला. दुनिथ वेलल्गेने त्याला क्लीन बोल्ड केले. रोहितने 48 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. या सामन्यात वेलल्गेने एकहाती टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले आहे. त्याने सलग तीन षटकांत भारताच्या तीन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले.
भारताची दुसरी विकेट 90 धावांवर पडली. विराट कोहली 12 चेंडूत तीन धावा करून बाद झाला. दुनिथ वेलल्गेच्या चेंडूवर तो दासुन शनाकाकरवी झेलबाद झाला. भारतीय संघाच्या चांगल्या सुरुवातीनंतर वेलल्गेने सामन्यात श्रीलंकेला कमबॅक करून दिले.
रोहित शर्माने 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 51 वे अर्धशतक आहे. या डावात त्याने 10 हजार वनडे धावाही पूर्ण केल्या. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या एका विकेटवर 100 धावांच्या जवळ पोहोचली.
रोहित शर्माने 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 51 वे अर्धशतक आहे. या डावात त्याने 10 हजार वनडे धावाही पूर्ण केल्या. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या एका विकेटवर 100 धावांच्या जवळ पोहोचली.
भारताची पहिली विकेट 80 धावांवर पडली. शुभमन गिल 25 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. दुनिथ वेलल्गेने त्याला क्लीन बोल्ड केले.
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ : पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश तिक्षाना, कसुन राजिथा, मथिशा पाथिराना.
भारतीय संघ आज सलग तिसऱ्या दिवशी मैदानात उतरणारला आहे. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना रविवारी दुपारी सुरू झाला, जो सोमवारी रात्री संपला. यानंतर टीम इंडिया आज (मंगळवारी) श्रीलंकेसोबत सामना खेळत आहे. श्रीलंकेतील उष्ण आणि दमट वातावरणात सतत क्रिकेट खेळणे कठीण आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांनी सोमवारी रात्री 19 षटके टाकली होती आणि आता पुन्हा आज त्यांना किमान 30 षटके टाकावी लागणार आहेत. भारतीय खेळाडूंसाठी हे आव्हानात्मक असू शकते.
श्रेयस अय्यर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर आहे. बीसीसीआयने एक अपडेट जारी करून याबाबत माहिती दिली आहे. निवेदनात म्हटलंय की, 'शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर तो नुकताच संघात परतला होता. मार्चमध्ये त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. मात्र, आता ही समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. हेल्थ अपडेट जारी करताना, बीसीसीआयने म्हटलंय की, श्रेयस अय्यरला बरे वाटत आहे, परंतु अद्याप तो पाठीच्या दुखण्यापासून पूर्णपणे बरा झालेला नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून आज श्रीलंकेविरुद्ध भारताच्या सुपर-4 सामन्यासाठी तो संघासोबत स्टेडियममध्ये गेलेला नाही.'
आता प्रश्न उपस्थित होत आहे की जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर 17 सप्टेंबरला होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यापर्यंत तो फिट असेल का? विश्वचषकापूर्वी टीम इंडियालाही धक्का बसू शकतो. नेपाळविरुद्धच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना डायव्हिंग करताना श्रेयसला दुखापत झाली होती.