

पुढारी ऑनलाईन डेस्क : KL Rahul Asia Cup : दुखापतीतून बरा झाल्यानंतर केएल राहुलने धमाकेदार पुनरागमन केले आहे. त्याने आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 फेरीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक तडकावून टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. राहुल हा दुखापतीमुळे बराच काळ मैदानापासून दूर होता. त्यानंतर त्याची आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. पण पुन्हा दुखापत झाल्याने तो स्पर्धेतील पहिले सोन सामने खेळू शकला नव्हता. पण त्यानंतर राहुलने थेट सुपर 4 फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात अर्धशतक झळकावले. श्रीलंकेच्या भूमीवर त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले आहे.
केएल राहुलने पाकविरुद्ध आपले अर्धशतक 60 चेंडूत पूर्ण केले आणि यादरम्यान त्याने आपल्या बॅटमधून एक षटकार आणि 5 चौकार मारले. यादरम्यान त्याने विराट कोहलीसह तिसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारीही पूर्ण केली. राहुलने एकदिवसीय फॉर्मेटमध्ये श्रीलंकेच्या भूमीवर पहिले अर्धशतक झळकावले तर पाकिस्तानविरुद्धचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे त्याचे दुसरे अर्धशतक आहे. राहुलची श्रीलंकेच्या भूमीवर वनडे क्रिकेटमधील यापूर्वीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 25 होती.
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. त्याने या संधीचे सोने केले आणि संघाला अजिबात निराश केले नाही. त्याने शानदार फलंदाजी करत श्रेयसची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. यापूर्वी केएलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत 8 सामन्यात 266 धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा समावेश होता.