Ishan Kishan : इशान ‘असा’ ठरला भारतासाठी सर्वात मोठा गेम चेंजर! | पुढारी

Ishan Kishan : इशान ‘असा’ ठरला भारतासाठी सर्वात मोठा गेम चेंजर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 15 जणांच्या या संघात फलंदाज इशान किशन आणि केएल राहुल यांना यष्टिरक्षक फलंदाज म्हणून स्थान मिळाले आहे. वास्तविक, डावखुरा फलंदाज इशानची आकडेवारी दर्शवते की या खेळाडूने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे तो अगामी विश्वचषकात भारतीय संघासाठी गेम चेंजर ठरू शकतो. इशान हा आपल्या स्फोटक फलंदाजीशिवाय परिस्थितीशी जुळवून घेण्यात यशस्वी ठरला आहे. आयपीएल व्यतिरिक्त त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपली उत्कृष्ट क्षमता दाखवली आहे.

इशानकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या

अलीकडेच आशिया चषकात भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध संघर्ष करत असताना 66 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर इशान किशनने हार्दिक पंड्यासोबत शानदार भागीदारी करत टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. त्याने पाकिस्तानविरुद्ध 81 चेंडूत 82 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार मारले. यापूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यावर इशानने आपली छाप सोडली होती. आता या यष्टीरक्षक फलंदाजाला विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग बनवण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

इशान किशनची कारकीर्द कशी आहे?

इशानच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने 19 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने यादरम्यान 776 धावा केल्या असून त्याची सरासरी 48.5 आणि स्ट्राइक रेट 106.74 राहिला आहे. इशानचे वनडे फॉरमॅटमध्ये 1 शतक आहे. त्याची वनडे फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या 210 धावा आहे. याशिवाय इशान किशनने वनडे फॉरमॅटमध्ये 7 वेळा पन्नास धावांचा आकडा पार केला आहे.

Back to top button