

उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असणार्या भारतीय संघाचा सामना शुक्रवारी स्कॉटलंडशी ( India vs Scotland ) होणार आहे. या लढतीत भारतीय संघाचे लक्ष मोठा विजय मिळवण्यावर असणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या लढतीत भारताने 66 धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघ आपला हाच फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासोबत दुसर्या संघांच्या कामगिरीवरदेखील लक्ष ठेवावे लागणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पहिल्या दोन लढतीत पराभूत झाल्यानंतर भारताचा रन रेटदेखील खराब झाला आहे. भारतासाठी आता प्रत्येक लढत महत्त्वाची आहे. पाकिस्तान चार विजयांसह उपांत्यफेरीत पोहोचला आहे. तर, न्यूझीलंड संघदेखील तेथे पोहोचण्याची शक्यता अधिक आहे. न्यूझीलंड नामिबिया किंवा अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यास भारताच्या आशा जिवंत राहतील.
भारताची ( India vs Scotland ) नजर मोठ्या फरकाने विजय मिळवण्यावर असतील. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध अपयशी राहिल्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध भारताच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. रोहित शर्माने या लढतीत अर्धशतक झळकावत चमकदार कामगिरी केली. के. एल. राहुल, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या सर्वांनी अफगाणिस्तान संघाविरुद्ध धावा केल्या. सूर्यकुमार यादव संघात आल्याने फलंदाजी मजबूत झाली आहे.
रवींद्र जडेजानेदेखील चमक दाखवली. चार वर्षांनंतर टी-20 सामना खेळणार्या अश्विनने 14 धावा देत दोन विकेटस् मिळवल्या. अनेकांनी अश्विनला बाहेर ठेवण्याबाबत टीका केली होती. त्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आले. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला दुखापत झाल्याने अश्विनला संधी देण्यात आली. त्यामुळे संघात चक्रवर्तीला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी चांगली गोलंदाजी केली. दुसरीकडे स्कॉटलंड संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे भारत त्यांना हलक्याने नक्कीच घेणार नाही.
भारतीय संघाने बुधवारी टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानचा 66 धावांनी धुव्वा उडवला. मात्र, या सामन्यानंतर ग्रुप-2 मधील चुरस आणखीन वाढली आहे. उपांत्य फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ कोण? यासाठी तीन संघांची दावेदारी कायम आहे; पण यामध्येही भारताला 'जर-तर'च्या आधारावर उपांत्य फेरी गाठता येणार आहे. म्हणजे सामन्याचे काही ठरावीक निकाल लागले तर ग्रुप स्टेजमधील सर्व सामने संपल्यानंतर भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तानचे प्रत्येकी सहा गुण होण्याची शक्यता आहे. या ग्रुपमधील 'जर-तर'चे गणित कसे आहे, ते समजावून घेऊ.