उणीव डावखुर्‍या जलदगती गोलंदाजांविरुद्ध सरावाची | पुढारी

उणीव डावखुर्‍या जलदगती गोलंदाजांविरुद्ध सरावाची

स्वीच हिट : निमिष पाटगावकर

भारत-पाकिस्तान सामन्यात जेव्हा शाहिन आफ्रिदी आपली कामगिरी चोखपणे पार पडत होता, तेव्हा मला आठवला तो 2019 चा विश्वचषक. मिशेल स्टार्क, मोहम्मद आमीर, वहाब रियाझ ट्रेंट बोल्टसारखे डावखुरे जलदगती गोलंदाज विश्वचषक गाजवत होते. तेव्हा भारत-ऑस्ट्रेलिया या आपल्या स्पर्धेतील दुसर्‍याच ओव्हलच्या सामन्याच्या आधी पत्रकार परिषदेत मी तेव्हाचे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना प्रश्न विचारला होता, जगातल्या उत्तमोत्तम डावखुर्‍या जलदगती गोलंदाजांना तोंड द्यायला आपल्या संघात एकही डावखुरा जलदगती गोलंदाज नसताना कशी तयारी केली आहे? त्यावर अरुण यांनी आपल्याकडे खलील अहमद हा नेट बॉलर आहे आणि त्याच्याकडून आम्ही सराव करून घेतो आणि थ्रो डाऊन्सचा सराव करतो, या उत्तराने वेळ मारून नेली होती.

फास्ट फॉरवर्ड करून चार वर्षांनी या आशिया चषकाच्या भारत-पाकिस्तान मोठ्या सामन्याच्या आधी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अशाच प्रश्नावर उत्तर देताना सांगितले, आमच्याकडे काही शाहिन, नसीम किंवा रौफसारखे गोलंदाज सरावासाठी नाहीत, तेव्हा आमच्याकडे जे गोलंदाज आहेत, त्यांनाच घेऊन आम्ही सराव करतो; हे उत्तर जरी त्याने थोडेसे गमतीत दिले तरी यात डावखुर्‍या जलदगती गोलंदाजाचा सराव करण्यासाठी आपल्याकडे त्या दर्जाचा गोलंदाज नाही ही शोकांतिका आहे. आपण आजही खलील अहमद, प्रदीप संगवान, अनिकेत चौधरी आणि जयदेव उनाडकट या डावखुर्‍या गोलंदाजांच्या सरावावर जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचा सामना करण्याची स्वप्ने बघतो. खलील अहमदने या चार वर्षांत 11 एक दिवसीय आणि 14 टी-20 सामने भारतातर्फे खेळले. हे बहुतांशी मुख्य खेळाडूंना आराम द्यायच्या निमित्ताने केलेल्या संघ बदलाच्या कृपेने होते आणि आजही तो नेट बॉलरच राहिला आहे. उनाडकटही आपली छाप पडू शकला नाही. बाकीचे दोघे तर ‘आयपीएल’मध्ये थोडेफार खेळलेले आहेत. याचाच अर्थ 2019 च्या विश्वचषकापासून धडा घेऊन आपण गेल्या चार वर्षांत एकही जागतिक दर्जाचा डावखुरा जलदगती गोलंदाज निर्माण करू शकलो नाही. आज तंत्रज्ञानाचा इतका आधार असताना आपल्या टॉप ऑर्डरचे नव्या चेंडूवर डावखुर्‍या जलदगती गोलंदाजांविरुद्ध धडपडणे लाजिरवाणे वाटते.

सर्व संघांनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीतील तंत्राचे अ‍ॅनालिसिस करून तयारी केली आहे. त्यामुळे प्रत्येक संघात भारताविरुद्धच्या लढतीच्या नियोजनात डावखुर्‍या जलदगती गोलंदाजांचे स्थान अबाधित आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या संघात मिशेल स्टार्क आहेच, शाहिन आफ्रिदीचा दबदबा आपण बघत आहोतच, आपल्या कुटुंबाला जास्त वेळ द्यायला न्यूझीलंडच्या मध्यवर्ती करारावर सही करायला नकार देणार्‍या ट्रेंट बोल्टलाही न्यूझीलंडने आता चालू असलेल्या इंग्लड दौर्‍यात विश्वचषकाची तयारी म्हणून निवडले आहे. इंग्लडकडे सॅम करन, डेव्हिड विली, रिस टॉपली आहेत, श्रीलंकेकडे साडेसहा फुटी फर्नांडो आहे. बांगला देशकडे मुस्तफिजूर रेहमान आहे.
हा विश्वचषक भारतात आहे आणि ‘आयसीसी’ फलंदाजीसाठी पोषक खेळपट्ट्या करायचे आदेश देतील. आपल्या हवेत इंग्लंडमध्ये मिळणारा स्विंग मिळणार नाही, हे सर्व कागदावर खरे असले तरी पाकिस्तानचे सोडले, तर आज बहुतांशी संघांचे गोलंदाज ‘आयपीएल’मुळे भारतीय वातावरणात गोलंदाजीचा उत्तम अनुभव आहे. भारताचे विश्वचषकाचे सामने नऊ वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. चेन्नईला उत्तर पूर्व मान्सून नोव्हेंबरपर्यंत चालतो, तर बाकी बहुतांशी ठिकाणी दडी मारून बसलेला मान्सून ऑक्टोबरपर्यंत कार्यरत राहील. परवा कँडीला म्हणजेच आपल्या परिचित भारतीय उपखंडातील मैदानात जेव्हा ढगाळ हवा होती, तेव्हा फलंदाजीला पोषक वातावरणातही पाकिस्तानी स्विंग विरुद्ध आपली आघाडीची फळी कोलमडली.

भारतासारख्या बलाढ्य संघात गुणवत्तेची कमी कधीच नसते, अभाव असतो तो योग्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध योग्य सरावाचा. आज नेपाळविरुद्ध आपला स्पर्धेच्या फॉरमॅटनुसार अस्तित्वाचा सामना आहे. नेपाळने पाकिस्तानला अडचणीत आणले होते; पण त्यातले मुख्य कारण पाकिस्तानी फलंदाजांची धावा घेतानाही हाराकिरी हे होते. तेव्हा आपल्याला जिंकायला अडचण यायला नको. आतापर्यंत वेस्ट इंडिज, आयर्लंड विरुद्ध आपली प्रयोगशाळा झाली आहे. आता विश्वचषकाच्या संघाला जपण्याऐवजी आशिया चषकातले पुढचे सर्व सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 सामन्यांची मालिका या संघाने खेळली पाहिजे. आज भारतीय संघात विविध स्पर्धांत विविध संघ खेळल्याने संघात एकसंधता दिसत नाही. ती साधायला विश्वचषकापर्यंत या संघाने कुटुंबासारखे एकत्र राहणे गरजेचे आहे.

Back to top button