

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK Asia Cup : आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये थरारक लढत पहायला मिळत आहे. श्रीलंकेच्या कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. सध्याच्या स्पर्धेतील भारताचा हा पहिला तर पाकिस्तानचा दुसरा सामना आहे. भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मैदानात उतरताच मोठा इतिहास रचला. त्याने फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाला मागे एक मोठा विक्रम केला आहे. 8 आशिया कप खेळणारा रोहित हा एकमेव भारतीय खेळाडू बनला आहे.
भारतासाठी सर्वाधिक आशिया चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी पोहोचला आहे. रोहित आठवा आशिया चषक खेळत आहे. त्याच्यानंतर जडेजाचा (7) क्रमांक लागतो. स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर हे प्रत्येकी सहावेळा आशिया कप खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तर टीम इंडियाचे माजी कर्णधार एमएस धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी पाच-पाचवेळा ही स्पर्धा खेळली आहे. (IND vs PAK Asia Cup)
भारताची सुरुवात खराब…
शनिवारी पाकिस्तानविरुद्ध भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताला पहिला धक्का रोहितच्या रूपाने एकूण 15 धावांवर बसला. रोहितने 22 चेंडूंत 2 चौकारांसह 11 धावा केल्या. शाहीन शाह आफ्रिदीने 5 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर भारतीय कर्णधाराला क्लिन बोल्ड केले. रोहितने ऑफ स्टंपवर पडलेला चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅट आणि पॅडच्या गॅपमधून विकेटवर आदळला. त्यानंतर सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शाहीनने विराट कोहलीला बोल्ड केले. कोहलीने 7 चेंडूत 4 धावा केल्या. यानंतर हरिस रौफने भारताला तिसरा धक्का दिला. त्याने दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर श्रेयस अय्यरला बाद केले. अय्यर 9 चेंडूत 14 धावा करून फखर झमानकडे झेल देऊन तंबूत परतला. अशाप्रकारे भारतीय संघाने पहिल्या 10 षटकांत आपले तीन फलंदाज गमावले. (IND vs PAK Asia Cup)