US Open 2023 : जोकोव्हिच, स्वियातेक विजयी | पुढारी

US Open 2023 : जोकोव्हिच, स्वियातेक विजयी

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : ‘यूएस ओपन टेनिस 2023’ स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये नोव्हाक जोकोव्हिच आणि महिला एकेरीमध्ये इगा स्वियातेक यांनी सरळ सेटमध्ये विजय मिळवत तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. सामन्यादरम्यान जोकोव्हिच आणि स्वियातेक यांना प्रचंड उकाडा जाणवत होता.

दुसरे मानांकन असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने रँकिंगमध्ये 76 व्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या बर्नाबे जापाटा मिरालेसचा 6-4, 6-1, 6-1 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर अव्वल मानांकन असलेल्या पोलंडच्या स्वियातेकने ऑस्ट्रेलियाच्या डारिया साविलेचा 6-3, 6-4 अशा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. स्वियातेक ही ‘यूएस ओपन’ची गतविजेती आहे.

सातवे मानांकन प्राप्त स्टेफानोस तित्सिपासला मोठा धक्का बसला. त्याला स्वित्झर्लंडच्या डॉमिनिक स्टिकरने 7-5, 6-7, 6-7, 7-6, 6-3 अशी मात दिली. यापूर्वी अमेरिकेच्या सहाव्या मानांकित कोको गॉफने रशियाच्या 16 वर्षांच्या मीरा आंद्रिवाचा 6-3, 6-2 असा पराभव केला. आता तिचा सामना बेल्जियमच्या एलिसे मर्टेंससोबत होणार आहे. रशियाच्या दानिल मेदवेदेवने एक तास 14 मिनिटे चाललेल्या सामन्यात एट्टिला बालाजचा 6-1, 6-1, 6-0 असा पराभव केला.

महिला एकेरीमध्ये अमेरिकेची अनुभवी विनस विलियम्सला पराभवाचा धक्का बसला. तिला बेल्जियमच्या पात्रता फेरी खेळून आलेल्या ग्रीट मिनेनने 6-1, 6-1 अशा दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले. विनसचा यूएस ओपन ग्रँडस्लॅमधील 100 वा सामना होता. त्यात तिचा सहज पराभव झाला. तिने 2000 आणि 2001 मध्ये ‘यूएस ओपन’ जिंकली होती.

Back to top button