भारत-पाक लढतीची तिकिटे तासातच खल्लास | पुढारी

भारत-पाक लढतीची तिकिटे तासातच खल्लास

नवी दिल्ली; पीटीआय : आयसीसी विश्वचषक 2023 च्या तिकिटांची विक्री सुरू झाली असून यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याच्या पहिल्या खेपेतील तिकिटे अवघ्या तासाभरातच विकली गेली आहेत. त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा पडली असून त्यांनी सोशल मीडियावर आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामन्याबद्दल दोन्हीकडील चाहत्यांमध्ये नेहमी एक वेगळीच उत्सुकता असते. यंदा विश्वचषक स्पर्धा भारतात होत असल्यामुळे प्रत्येक भारतीय चाहत्याला पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तिरंगा फडकवायचा आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याबाबत चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह आहे.

बुक माय शो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या तिकीट भागीदाराने भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे ऑनलाईन विक्रीसाठी ठेवली होती. या सामन्याच्या तिकिटांची दुसरी खेप 3 सप्टेंबर रोजी विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. ही तिकिटेही काही तासांतच विकली जाण्याची शक्यता आहे. भारताचे सामने आणि सराव सामन्यांसाठी किती तिकिटे ऑनलाईन विक्रीसाठी ठेवली गेली याचा तपशील उपलब्ध झाला नाही. तिकिटांची विक्री 29 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता सुरू झाली आणि सर्व तिकिटे एका तासात विकली गेली.

केवळ मास्टरकार्डधारकांसाठीच

तिकिटांची विक्री केवळ मास्टरकार्डधारकांसाठी ठेवण्यात आली होती. 29 ऑगस्ट रोजी तिकिटे केवळ मास्टरकार्ड असलेल्या चाहत्यांसाठी विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. एका व्यक्तीला दोन तिकिटे खरेदी करता आली आणि भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटे विक्री सुरू झाल्याच्या तासाभरात विकली गेली.

चाहत्यांकडून तीव्र संताप

दरम्यान, बुक माय शोच्या भोंगळ सेवेबद्दल क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तिकीट विक्री थेट सुरू होताच काही मिनिटांत, बुक माय शोची वेबसाइट क्रॅश झाली. यानंतरही चाहत्यांना आभासी रांगेत उभे असल्याचे दाखवण्यात आले. काही सेकंद गेले असताना प्रतीक्षा वेळ वेगाने वाढला. बुक माय शो वेबसाईटने चाहत्यांना 6 तासांपेक्षा जास्त काळ संयमाने वाट पाहण्यास सांगितले; मात्र सगळी तिकिटे एका तासात विकली गेली. त्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त करून या तिकीट विक्रीबद्दल अनेकविध शंका उपस्थित केल्या आहेत.

यापेक्षा भारतीय संघात निवड होणे अधिक सोपे

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे खरेदी करणे हे खरोखरच दिव्य कार्य आहे. त्यापेक्षा भारतीय क्रिकेट संघात निवड होणे अधिक सोपे आहे, अशा उपरोधिक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या.

Back to top button