Asia Cup : पाकिस्तानचा सर्वात मोठा विजय, नेपाळचा 238 धावांनी पराभव | पुढारी

Asia Cup : पाकिस्तानचा सर्वात मोठा विजय, नेपाळचा 238 धावांनी पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup PAKvsNEP : पाकिस्तानने आशिया कप 2023 ची सुरुवात विजयाने केली आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बाबरच्या संघाने नेपाळचा 238 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 6 गडी गमावून 342 धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने 151 आणि इफ्तिखार अहमदने नाबाद 109 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ 23.4 षटकांत 104 धावांवर गारद झाला. पाकिस्तानचा पुढील सामना भारताविरुद्ध 2 सप्टेंबरला तर नेपाळचा पुढील सामना भारताविरुद्ध 4 सप्टेंबरला आहे.

पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी नेपाळच्या आघाडीच्या फळीला उद्ध्वस्त केले. 343 धावांचा पाठलाग लरणा-या नेपाळ संघाने 14 धावांत तीन विकेट गमावल्या. कुशल भुरटेल आठ, आसिफ शेख पाच धावा आणि कर्णधार रोहित पौडेल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. आरिफ शेख आणि सोमपाल कामी यांनी चौथ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. हरिसने ही भागीदारी तोडली. त्याने आरिफ शेखला बोल्ड केले. शेखला 38 चेंडूत 26 धावा करता आल्या. यानंतर हरिसने सोमपालला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याला 46 चेंडूत 28 धावा करता आल्या. त्यानंतर शादाब खानच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. त्याने चार विकेट घेत नेपाळच्या खालच्या फळीला उद्ध्वस्त केले. गुलशन झा 13, दीपेंद्र सिंग तीन, कुशल मल्ला सहा धावा करून बाद झाले. तर संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी यांना खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानकडून शादाबने चार विकेट घेतल्या. त्याचवेळी शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. फखर जमान 14 धावा करून बाद झाला तर इमाम उल हक 5 धावा करून बाद झाला. यानंतर बाबर आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. रिझवान 50 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 44 धावा करून धावबाद झाला. आगा सलमान पाच धावा करून संदीप लामिछानेचा बळी ठरला. यानंतर मुलतानमध्ये बाबर आणि इफ्तिखारचे वादळ पाहायला मिळाले. बाबरने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 19 वे शतक झळकावले. 131 चेंडूत 14 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 151 धावा करून तो बाद झाला. त्याचवेळी इफ्तिखारने 67 चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. इफ्तिखारने 71 चेंडूंत 11 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. तो नाबाद राहिला. शादाब चार धावा करून नाबाद राहिला. नेपाळकडून सोमपाल कामीने दोन बळी घेतले. त्याचवेळी करण केसी आणि लामिछाने यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

आशिया कपमधील दुसरा सर्वात मोठा विजय

आशिया कपच्या इतिहासातील हा पाकिस्तानचा सर्वात मोठा विजय आहे. पाक संघाने यापूर्वी 2000 मध्ये बांगलादेशचा 233 धावांनी पराभव केला होता. पाकिस्तानचा एकदिवसीय इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या संघाने यापूर्वी 2016 मध्ये आयर्लंडचा 256 धावांनी तर 2018 मध्ये झिम्बाब्वेचा 244 धावांनी पराभव केला आहे. तर आशिया चषकाच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम भारताच्या नावावर आहे. टीम इंडियाने 2008 मध्ये हाँगकाँगचा 256 धावांनी पराभव केला होता.

मुलतानच्या मैदानावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 131 चेंडूत 151 धावा केल्या, तर इफ्तिखार अहमदने नाबाद 109 धावांचे योगदान दिले. दोघांमध्ये 214 धावांची भागीदारी झाली. मोहम्मद रिझवानने 44 धावांचे योगदान दिले.

बाबरने मोडला हाशिम आमलाचा ​​विक्रम

बाबर सर्वात जलद 19 शतके करणारा फलंदाज ठरला. त्याने 102 डावात ही कामगिरी केली आहे. यचबरोबर पाकच्या कर्णधाराने द. आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हाशिम आमलाचा ​​विक्रम मोडला. अमलाने 104 डावात 19 शतके झळकावली होती.

बाबर-रिजवानने पाकिस्तानचा डाव सांभाळला

7 व्या षटकापर्यंत पाकिस्तानने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या दोघांनी पाकिस्तानच्या डावाची धुरा सांभाळत 75 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. रिजवान 24व्या षटकात 44 धावा करून धावबाद झाला आणि ही भागीदारी तुटली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 106 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली.

दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हन :

पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ.

नेपाळचा संघ : रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्तेल, अर्जुन सौद, आसिफ शेख, आरिफ शेख, सोमपाल कामी, दीपेंद्र सिंग आयरे, करण केसी, कुशल माला, संदीप लामिछाने, ललित राजबंशी आणि गुलशन झा.

Back to top button