Neeraj Chopra : नीरजने तिरंग्याच्या सन्मानार्थ फेटाळली महिला चाहतीची ‘ती’ मागणी, म्हणाला… | पुढारी

Neeraj Chopra : नीरजने तिरंग्याच्या सन्मानार्थ फेटाळली महिला चाहतीची ‘ती’ मागणी, म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (world athletics championships) स्पर्धेत इतिहास रचला. त्याने 88.17 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. अशी करणारा तो पहिला भारतीय अॅथलीट ठरला. पदक जिंकल्यानंतरही भारताच्या या विक्रमादित्याचे पाय जमीनीवर आहेत हे दाखवणारा एक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल नीरजने आपल्या कृतीतून आदर व्यक्त केला असून अनेकांनी यासाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तिरंग्यावर स्वाक्षरी मागताच नीरज म्हणाला…

नीरजने (Neeraj Chopra) सुर्णपदक जिंकल्यानंतर अनेकांनी त्याचे अभिनंदन केले. चाहत्यांसह स्पर्धेतील इतर खेळाडूही भारतीय खेळाडूसोबत मैदानामध्येच फोटो काढताना दिसले. याचदरम्यान निरजची स्वाक्षरी मिळण्यासाठी प्रत्येक चाहता धडपडत होता. अशातच एक हिंदी भाषेत उत्तमपणे संवाद साधू शकणारी हंगेरीयन महिला चाहती नीरज जवळ आली आणि तिने भारतीय राष्ट्रध्वज पुढे करत त्यावर स्वाक्षरी देण्याची विनंती केली. महिला चाहतीची ही मागणी भारताच्या गोल्डन बॉयने फेटाळून लावली. पण नकार देतानाही निरजने ‘तिरंग्यावर स्वाक्षरी करणार नाही’ असे चाहतीला अगदी प्रेमाने समजावून सांगितले. अखेर त्या महिलेने तिने परिधान केलेल्या जर्सीच्या उजव्या बाहीवर नीरजची स्वाक्षरी घेतली. नीरजला भेटता आल्याने आणि त्याने स्वाक्षरी दिल्याने ही चाहती भलतीच खूश होती.

नीरजचे पाकिस्तानच्या अर्शदसोबत फोटो क्लिक (Neeraj Chopra)

दरम्यान नीरजने पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा तिरंग्यासोबत झेक रिपब्लिकचा अॅथलीट याकूब वालेशसोबत फोटो क्लिक करत होता. या दोन्ही खेळाडूंकडे आपापल्या देशाचा ध्वज होता. त्यानंतर नीरजची नजर त्याच्या डाव्या बाजूला उभा असणा-या अर्शदकडे गेली आणि त्याने पाकिस्तानी खेळाडूला फोटो क्लिक करण्यासाठी बोलावले. निरजच्या बोलावण्याला मान देत पाकिस्तानचा अर्शद लगेचच भारतीय खेळाडूच्या जवळ आला. त्या ऐतिहासिक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नीरजच्या कृतीचेही जगभरातून कौतुक होत आहे.

‘सुवर्ण पदक संपूर्ण भारतीयांचे’

सुवर्ण कामगिरीनंतर नीरजने (Neeraj Chopra) भारतवासीयांचे आभार मानले. तो म्हणाला की, ‘मी भारतीयांचे आभार मानू इच्छितो. माझ्या यशासाठी देशवासीयांनी रात्र जागून मला सुवर्ण पदक मिळण्यासाठी प्रोत्साहित केले. मी जिंकलेले हे सुवर्ण पदक संपूर्ण भारतीयांसाठी अर्पण करतो. या आधी ऑलिम्पिक चॅम्पियन बनलो आणि आता वर्ल्ड चॅम्पियनला गवसणी घातली आहे. भारतीय खेळाडू काहीही करू शकतो. प्रत्येकाने असेच आपापल्या क्षेत्रात मेहनत करून भारताचा जगात सतत नावलौकिक करावा.’

Back to top button