Heath Streak : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकच्या मृत्यूची अफवा | पुढारी

Heath Streak : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकच्या मृत्यूची अफवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक याचे वयाच्या ४९ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाल्याची बातमी आज (दि.२३) सकाळी आल्यानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. दरम्यान, स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी देणारा त्याचा माजी सहकारी हेनरी ओलांगा याने आता ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगून स्ट्रीक जिवंत असल्याचे म्हटले आहे.

हेन्री ओलांगा याने ट्विट करून हीथ स्ट्रीक आता दुस-या जगात गेल्याची दुःखद बातमी आली असल्याची माहिती दिली होती. झिम्बाब्वे क्रिकेटच्या महान क्रिकेटपटूच्या आत्म्याला शांती लाभो. तुझ्यासोबत खेळणे हा एक सन्मान आहे, असे त्याने म्हटले होते. स्ट्रीकच्या सहकाऱ्यानेच ही माहीती दिल्याने सर्वांना खात्री पटली होती. त्यानंतर संपूर्ण क्रिकेट जगतावर शोककळा पसरली. अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली असतानाच आपल्या मृत्यूची बातमी ऐकून स्वत: स्ट्रकला धक्का बसला. त्याने लगेच मी जिवंत असल्याचे सांगितले. त्यानंतर हेनरी ओलांगा यानेही आधीचे ट्विट डिलीट केले आणि स्ट्रीक जिवंत असल्याचे सांगितले.

हीथ स्ट्रीकची कारकीर्द

झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या हीथने नोव्हेंबर १९९३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा पहिला सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना होता. यानंतर डिसेंबर १९९३ मध्ये हीथने पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने शेवटची वनडे ऑगस्ट २००५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि शेवटची कसोटी सप्टेंबर २००५ मध्ये भारताविरुद्ध खेळली. हीथने आपल्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरला तीनदा आणि सौरव गांगुलीला चार वेळा बाद केले. आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात, हीथने भारताविरुद्धच्या हरारे कसोटीच्या पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केली. त्याने निम्मा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता. हीथने त्या सामन्याच्या पहिल्या डावात ३२ षटकात ७३ धावा देत सहा विकेट घेतल्या. मात्र, त्याच्या चमकदार कामगिरीनंतरही टीम इंडियाने तो सामना १० गडी राखून जिंकला.

हिथ स्ट्रीकने ६५ कसोटी आणि १८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर कसोटीत १९९० आणि एकदिवसीय सामन्यात २९४३ धावा आहेत. टेस्टमध्ये हीथने एक शतक आणि ११ अर्धशतकं झळकावली, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १३ अर्धशतकं झळकावली. याशिवाय हीथने कसोटीत २१६ आणि एकदिवसीय सामन्यात २३९ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत ७३ धावांत सहा आणि एकदिवसीय सामन्यात ३२ धावांत पाच विकेट अशी त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. याशिवाय तो आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा प्रशिक्षकही होता.

२००५ मध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. २००७ मध्ये त्याने इंडियन क्रिकेट लीग (ICL) साठी साइन अप केले आणि त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास संपला. भ्रष्टाचारविरोधी उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीने त्याच्यावर आठ वर्षांची बंदी घातली होती हा त्याच्या कारकिर्दीला मोठा फटका बसला होता. हा धक्का असूनही क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून स्ट्रीकचा कारकीर्द मोठी आहे. त्याच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.

Back to top button