पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Asia Cup : आशिया कप स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र बीसीसीआयने अद्याप भारतीय संघ जाहीर केलेला नाही. दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे की अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती आगामी विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन आशिया कपसाठी संभाव्य 17 खेळाडूंचा संघ निवडू शकते. संघाची अधिकृत घोषणा 21 ऑगस्ट रोजी होईल असे सूत्रांकडून समजते आहे.
वास्तविक, टीम इंडियातील अनेक खेळाडू दुखापतीनंतर पुनरागमन करणार आहेत. रिपोर्टनुसार केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले आहे, परंतु चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. बीसीसीआय पहिल्यांदाच निवड समितीच्या बैठकीपासून लांब राहणार असल्याचे समजते आहे. अशातच सोमवारी सकाळी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. (Team India Asia Cup)
राहुल द्रविडच्या आधी, रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांसारख्या दिग्गजांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे, परंतु त्यांच्या कार्यकाळात ते कधीही निवड समितीच्या बैठकीचा भाग बनले नाहीत. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या संघाचे प्रशिक्षक हे निवड समितीचा भाग असतात, परंतु भारतात राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षक आणि कर्णधाराला संघ निवडीच्या बाबतीत मत मांडण्याचा अधिकार नाही. दरम्यान, प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघे या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहतील की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. (Team India Asia Cup)
लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू दुखापतींमधून बरे झालेले प्रमुख खेळाडू अद्याप त्यांची तंदुरुस्ती सिद्ध करू शकलेले नाहीत. बीसीसीआय अधिकारी आणि निवडकर्ते एक सुरक्षित पर्याय निवडू शकतात ज्यामुळे त्यांना श्रीलंकेतील आशिया कप दरम्यान पाच (अंतिम फेरीत पोहोचल्यास सहा) सामन्यांमध्ये सर्व उपलब्ध खेळाडू वापरून पाहण्याची संधी मिळेल. (Team India Asia Cup)
आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया चषक स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघाची तरतूद केली आहे. त्यानुसार पाकिस्तान, बांगलादेशने 17 सदस्यीय संघ जाहीर केले आहेत. दरम्यान, बीसीसीआयच्या एका सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, 'विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय तात्पुरती संघ निवडण्याची शक्यता आहे, जी 5 सप्टेंबरपर्यंत सादर करावी लागेल. मात्र, कोणताही संघ या यादीत बदल करू शकतो. संघ निवडीची यादी देण्याची अंतिम मुदत 27 सप्टेंबर आहे. त्यामुळे आशिया चषकासाठी आणखी खेळाडू निवडले जाऊ शकतात', असेही त्यांनी म्हटले आहे. (Team India Asia Cup)
सोमवारच्या बैठकीत डावखुरा फलंदाज तिलक वर्मा याच्या नावावर चर्चा होणार आहे, मात्र राहुल आणि अय्यर तंदुरुस्त राहिल्यास तिलकला अंतिम 15 मध्ये स्थान मिळणे कठीण होईल. संजू सॅमसनच्या बाबतीतही अशीच स्थिती होईल. संघातील अतिरिक्त फलंदाजासाठी सूर्यकुमार यादवचे पारडे जड असेल.
रविचंद्रन अश्विनच्या नावाची फिरकी गोलंदाजी विभागात चर्चा होण्याची शक्यता आहे. अश्विनचा वेस्ट इंडिजमधील मर्यादित षटकांच्या मालिकेत समावेश न केल्याने एका माजी राष्ट्रीय निवडकर्त्याने आश्चर्य व्यक्त केले होते. 'जर तुम्ही अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरवू शकत असाल तर अश्विनची चाचणी घेण्यात काय हरकत आहे. तो भारतीय मैदानांवर प्रतिस्पर्धी संघासाठी घातक ठरू शकते,' असे त्यांनी म्हटले होते.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक, फिटनेनुसार), श्रेयस अय्यर (फिटनेसनुसार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (पर्यायी यष्टिरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, युझवेंद्र चहल किंवा रविचंद्रन अश्विन.