

पॅरिस, वृत्तसंस्था : विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी केली असून, कंपाऊंड प्रकारात भारताला पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत सांघिक सुवर्णपदके मिळाली. पुरुष संघाने अमेरिकेच्या संघाला हरवले, तर महिला संघाने मेक्सिकोवर मात केली. या दोन्ही संघांत ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि आदिती स्वामी या तीन मराठमोळ्या खेळाडूंंचा समावेश आहे. महिला संघाने तर एकाच महिन्यात दुसरे सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत दोन सुवर्ण आणि दोन कांस्यपदके मिळाली आहेत.
या स्पर्धेत चौथे मानांकन मिळवलेल्या अभिषेक वर्मा, ओजस देवतळे आणि प्रथमेश जावकर यांच्या पुरुष कंपाऊंड संघाने ख्रिस शेफ, जेम्स लुत्ज, सॉयर सुलिवन यांचा समावेश असलेल्या अमेरिकेच्या द्वितीय मानांकित संघाला 236-232 असे हरवले.
या महिन्यात बर्लिन येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणार्या ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि परणीत कौर यांच्या संघाने कंपाऊंड प्रकारात मेक्सिकोवर संघर्षपूर्ण केवळ एका गुणाने विजय मिळवला.
भारतीय पुरुष संघ पहिल्या फेरीत एका गुणाने मागे पडला होता. त्यांनी 60 गुण मिळवले, तर भारतीय खेळाडूंनी 59 गुण मिळवले. दुसर्या फेरीतही भारतीय संघाने 59 गुण मिळवले; पण अमेरिकन संघ 58 गुणांवर थांबला. त्यामुळे दोन्ही संघांचे समान 118 गुण झाले. तिसर्या फेरीतही दोन्ही संघ बरोबरीत राहिले. चौथ्या फेरीत भारताच्या तिन्ही खेळाडूंनी अचूक निशाणा साधत परफेक्ट 60 गुणांची कमाई केली. या निर्णायक वेळी अमेरिकन खेळाडू मात्र चार गुणांनी मागे पडले, त्यामुळे भारतीय संघाला सुवर्णपदक मिळाले.
महिला संघाला सुवर्णपदकासाठी मेक्सिकन मुलींनी चांगलेच दमवले. पात्रता फेरीत अव्वलस्थानामुळे स्पर्धेत पहिले मानांकन मिळालेला भारतीय महिला संघ दुसर्या फेरीअखेर एका गुणाने पुढे होता. तिसर्या फेरीत त्यांनी 3 गुण गमावले; तर मेक्सिकोच्या एंड्रिया बेसेरा, अॅना हर्नांडेज जियोन आणि डेफने क्विंटरोने 59 गुण मिळवत 176 विरुद्ध 175 अशी एका गुणाची आघाडी घेतली; पण भारतीय महिलांनी विचलित न होता अंतिम फेरीत 59 गुण मिळवले. त्याचवेळी मेक्सिकन संघाला 57 गुण मिळाले. त्यामुळे भारतीय महिला संघाला महिन्यात दोनदा 'सुवर्ण' सन्मान मिळाला.
तत्पूर्वी, भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने स्पेनला हरवून कांस्यपदक मिळवले. याच गटात महिला संघालाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी मेक्सिको संघाला हरवले.
महिला संघाचा महिन्यात दुसर्यांदा विश्वविजय
जर्मनीची राजधानी बर्लिन येथे याच महिन्यात पहिल्या आठवड्यात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकले होते. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या 92 वर्षांच्या स्पर्धा इतिहासात भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळाले होते. आता पॅरीसमधील स्पर्धेतही ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांच्या याच संघाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या संघातील आदिती स्वामी ही सातारा येथील आहे.