England ODI Team : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, स्टोक्सचे वनडे संघात पुनरागमन | पुढारी

England ODI Team : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, स्टोक्सचे वनडे संघात पुनरागमन

पुढारी ऑनलाईन डेस्क : England ODI Team : इंग्लंडने बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी त्यांचा संघ जाहीर केला. दरम्यान, वनडे संघात बेन स्टोक्सचे पुनरागमन झाले असून त्याने 50-50 फॉरमॅटमधून निवृत्ती मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंडला पहिला विश्वचषक जिंकून देणा-या या अष्टपैलू खेळाडूने 18 जुलै 2022 रोजी निवृत्ती जाहीर केली होती.

इसीबीचे जोरदार प्रयत्न

स्टोक्स हा अलीकडच्या काळात सर्वाधिक मागणी असलेला क्रिकेटपटू आहे. मात्र, 2022 मध्ये वनडे फॉर्मेटमधून या स्टार अष्टपैलूने अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे त्यावेळी त्याने सांगितले होते. दरम्यान, स्टोक्सने वनडे निवृत्ती मागे घेण्यासाठी इसीबीने जोरदार प्रयत्न केले. मर्यादित षटकाच्या संघाचा कर्णधार जोस बटलरही एक खास जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार बटलरले स्टोक्सशी चर्चा केले आणि राष्ट्रीय संघासाठी त्याची वनडे निवृत्ती मागे घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. (England ODI Team)

तीन अनकॅप्ड खेळाडूंना संधी

अगामी वर्ल्डकपची तयारी पाहता न्यूझीलंडविरुद्धची वनडे आणि टी-20 मालिका इंग्लंड संघासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. उभय संघांमध्ये 30 ऑगस्टपासून चार टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल, जी 5 सप्टेंबरला संपेल. त्यानंतर दोन्ही संघ 8 सप्टेंबरपासून चार वनडे सामन्यांच्या मालिकेत आमने-सामने येतील. इंग्लंडने दोन्ही संघात अनकॅप्ड वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सनचा समावेश केला आहे. गेल्या आठवड्यात मँचेस्टर ओरिजिनल्सविरुद्ध ओव्हल इनव्हिन्सिबल्सकडून खेळताना अॅटकिन्स हा 95 मैल प्रतितास वेगाने गोलंदाजी करताना दिसला होता. त्याचवेळी, जोश टंग आणि जॉन टर्नर यांना टी-20 फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली. टंगने यावर्षी कसोटी पदार्पण केले आहे. (England ODI Team)

निवृत्तीतून पुनरागमन करणारा तिसरा क्रिकेटपटू

32 वर्षीय स्टोक्स ऑगस्ट 2023 मध्ये निवृत्तीतून पुनरागमन करणारा जगातील तिसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी तमीम इक्बाल आणि मोईन अली यांनी निवृत्ती मागे पुनरागमन केले आहे.

स्टोक्सची वनडेतही चमकदार कामगिरी

स्टोक्सने 2019 च्या वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये 98 चेंडूत 84* धावांची उत्कृष्ट खेळी साकारत इंग्लंडला पहिले विजेतेपद मिळवून दिले होते. त्यासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. स्टोक्सने 105 वनदे सामन्यांमध्ये 38.99 च्या सरासरीने आणि 95.09 च्या स्ट्राइक रेटने 2924 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने तीन शतके आणि 21 अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजी करताना त्याने 74 विकेट्स मिळवल्या आहेत. अलिकडच्या वर्षांत तो अनेक दुखापतींशी झगडत आहे. अशातच 2023 च्या वर्ल्डकपमध्ये तो केवळ एक फलंदाज म्हणून खेळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘स्टोक्सच्या पुनरागमनाने संघ नेतृत्वात मजबूत’

स्टोक्सच्या पुनरागमनाने चीफ सिलेक्टर ल्यूक राइट खूश झाले आहेत. ते म्हणाले की, ‘मला खात्री आहे की स्टोक्सच्या पुनरागमनाने सर्व क्रिकेट चाहत्यांना आनंद झाला असेल. त्याच्या येण्याने आमच्या संघात गुणवत्ता तर येईलच शिवाय संघ नेतृत्वातही मजबूत होईल,’ अशी भावना व्यक्त केली आहे.

इंग्लंडचा वनडे संघ

जोस बटलर (कर्णधार), बेन स्टोक्स, मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स

इंग्लंडचा टी-20 संघ

जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरान, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जोश टंग, जॉन टर्नर, ल्यूक वुड

टी-20 मालिका वेळापत्रक

पहिला टी-20 सामना : 30 ऑगस्ट
दुसरा T20 सामना : 1 सप्टेंबर
तिसरा टी-20 सामना : 3 सप्टेंबर
चौथा टी-20 सामना : 5 सप्टेंबर

वनडे मालिका वेळापत्रक

पहिली वनडे : 8 सप्टेंबर
दुसरी वनडे : 10 सप्टेंबर
तिसरी वनडे : 13 सप्टेंबर
चौथी वनडे : 15 सप्टेंबर

Back to top button