Hardik Pandya Record : हार्दिक पंड्याने धोनीला टाकले मागे, विराटशी केली बरोबरी | पुढारी

Hardik Pandya Record : हार्दिक पंड्याने धोनीला टाकले मागे, विराटशी केली बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs WI : भारतीय क्रिकेट संघाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली आहे. दरम्यान, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला टी-20 फॉरमॅटमध्ये लक्षवेधी यश मिळाले असून त्याच्या नेतृत्वाखाली संघीने एक मोठा विक्रमही रचला आहे.

हार्दिकने धोनीला मागे सोडले

कर्णधार म्हणून हार्दिकने पहिल्या 14 पैकी 9 सामने जिंकले आहेत. पहिल्या 14 टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत त्याने विराट कोहलीची बरोबरी केली असून महेंद्रसिंग धोनीला मागे टाकण्यात तो यशस्वी झाला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्या 14 पैकी 8 सामने जिंकले होते.

रोहित आघाडीवर

हिटमॅन रोहित शर्मा या बाबतीत आघाडीवर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या 14 पैकी 12 सामने जिंकले होते. मात्र टी-20 विश्वचषकापासून रोहित शर्माने भारतीय संघाकडून एकही टी-20 सामना खेळलेला नाही. जवळपास एक वर्षापासून संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे असून त्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

Back to top button