Yashasvi Jaiswal : यशस्वीच्या टी-20 फिफ्टीने रचला इतिहास! हिटमॅन रोहितचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला | पुढारी

Yashasvi Jaiswal : यशस्वीच्या टी-20 फिफ्टीने रचला इतिहास! हिटमॅन रोहितचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने (yashasvi jaiswal) टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात (1 धाव) स्वस्तात विकेट गमावली पण पुढच्याच सामन्यात त्याच्या बॅटमधून धावांची आतषबाजी झाली. यशस्वीने शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात 51 चेंडूत नाबाद 84 धावांची वादळी खेळी केली. त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच दुसरा सलामीवीर शुभमन गिल (77) सोबत पहिल्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी रचली. या विक्रमी सलामीच्या जोरावर भारताने 179 धावांचे लक्ष्य अवघ्या 17 षटकांत पूर्ण केले आणि केरेबियन संघाचा 9 विकेट्स राखून चुराडा केला. या विजयानंतर टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधून जबरदस्त कमबॅक केले आहे.

यशस्वीने (yashasvi jaiswal) 33 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने 50 धावा पूर्ण करताच त्याने ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा 14 वर्सांपूर्वीचा विक्रम मोडीत काढून इतिहास रचला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा यशस्वी हा सर्वात तरुण भारतीय सलामीवीर ठरला आहे. यशस्वीने वयाच्या 21 वर्षे 227 दिवसांत ही कामगिरी केली. तर, रोहितने 22 वर्षे 41 दिवसांत ही कामगिरी केली होती. त्याने 2009 साली इंग्लंडविरुद्ध अर्धशतक ठोकले होते. त्याच्यापाठोपाठ ईशान किशनचा क्रमांक लागतो, ज्याने 22 वर्षे 41 दिवसांत हा पराक्रम केला. ईशानने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.

मात्र, भारतासाठी एकूण टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात तरुण अर्धशतक करण्याचा विक्रम अजूनही रोहितच्या (Rohit Sharma) नावावर आहे. रोहितने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 वर्षे 143 दिवसांचा असताना नाबाद 50 धावा केल्या होत्या. या यादीत मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिलकने 20 वर्ष 271 दिवसांत अर्धशतक फटकावले. नुकतेच त्याने विंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हे कामगिरी केली. तिलकने 41 चेंडूंचा सामना करत 51 धावा तडकावल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर ऋषभ पंत (21 वर्षे 38 दिवस) आणि चौथ्या क्रमांकावर यशस्वी (21 वर्षे 227 दिवस) आहे.

टी-20 मध्ये अर्धशतक करणारे सर्वात तरुण भारतीय खेळाडू :

20 वर्षे 143 दिवस : रोहित शर्मा (नाबाद 50 वि. दक्षिण आफ्रिका 2007)
20 वर्षे 271 दिवस : तिलक वर्मा (51 विरुद्ध वेस्ट इंडीज 2023)
21 वर्षे 38 दिवस : ऋषभ पंत (58 विरुद्ध वेस्ट इंडिज 2018)
21 वर्षे 227 दिवस : यशस्वी जैस्वाल (84 नाबाद विरुद्ध वेस्ट इंडिज 2023)

Back to top button