जागतिक तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला कंपाऊंडच पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन; म्हणाले… | पुढारी

जागतिक तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला कंपाऊंडच पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन; म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला कंपाऊंड संघाचे अभिनंदन केले. “त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पणाचा हा उत्कृष्ट परिणाम आहे” अशा शब्दात त्यांनी खेळाडूंचे कौतूक केले आहे.

“कंपाऊंड महिला संघाने बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या चॅम्पियन्सचे अभिनंदन! त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण या उत्कृष्ट परिणामास कारणीभूत ठरले आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

भारताला ९२ वर्षांत पहिले सुवर्णपदक

ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा सहा गुणांच्या फरकाने विजय मिळवला. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ९२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी या स्पर्धेत भारताला ९ रौप्य व २ कांस्यपदक जिंकता आले होते. जर्मनीची राजधानी बर्लिन येथे खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत कोलंबियाचा २२०-२१६ असा पराभव केला होता. तिरंदाजी चॅम्पियनशिप ही स्पर्धा चार वर्षांतून एकदा आयोजित केली जाते. ऑलिम्पिक पात्रतेसाठीही कोटा आहे.

महिला कंपाऊंड गटात भारताचे सलग चौथे पदक

2017 आणि 2021 मध्ये रौप्य आणि 2019 मध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिला कंपाऊंड गटात भारताचे हे सलग चौथे पदक आहे. सुवर्णपदक विजेत्या संघातील ज्योती वेन्नम ही चारही पदके विजेत्या संघाचा भाग आहे. ज्योती सुरेखा वेन्नमचा जन्म 3 जुलै 1996 रोजी दक्षिण भारतीय शहर विजयवाडा येथे झाला. जागतिक क्रमवारीत ती 12 व्या क्रमांकावर आहे आणि तिला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे. 16 वर्षीय आदितीने मागील महिन्यात कोलंबिया येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषकात कंपाऊंड महिला गटात 18 वर्षांखालील विश्वविक्रम मोडला होता. तिने 720 पैकी एकूण 711 गुण मिळवले आणि मागील 705 गुणांचा जागतिक विक्रम मागे टाकला. पटियालाच्या परनीत कौरचे वडील अवतार हे सनौर येथील सरकारी शिक्षक, त्यांनी परनीतला छंद म्हणून खेळ घेण्यास प्रोत्साहन दिले.

हेही वाचा : 

Back to top button