India v New Zealand : आयपीएलचे ‘शेर’ वर्ल्डकपमध्ये ‘ढेर’

India v New Zealand : आयपीएलचे ‘शेर’ वर्ल्डकपमध्ये ‘ढेर’
Published on
Updated on

दुबई ; वृत्तसंस्था : विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल, ऋषभ पंत, इशान किशन ही क्रिकेटमधील मोठमोठी नावे न्यूझीलंडपुढे अक्षरश: कागदी वाघ ठरले. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड (India v New Zealand) यांच्यातील सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून 8 विकेटस्नी पराभव पत्करावा लागला.

न्यूझीलंडने भारताला 20 षटकांत 7 बाद 110 धावांवर रोखल्यानंतर हे आव्हान 14.3 षटकांत 2 विकेटस् गमावत पूर्ण केले. सलग दोन पराभवांमुळे भारताचे वर्ल्डकपमधील स्थान धोक्यात आले आहे. गुणतालिकेत भारत पाचव्या क्रमांकावर असून, त्यांची धावगती -1.609 इतकी कमी आहे. यामुळे भारताला उपांत्यफेरीची संधी अतिशय कमी आहे.

भारताच्या छोटेखानी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि डॅरिल मिशेल यांनी आक्रमक सुरुवात केली. झटपट 20 धावा बनवल्यानंतर गुप्टिलने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला; पण तो अपयशी ठरला. गुप्टिल तंबूत परतल्यानंतर मिशेलने मोर्चा सांभाळला. कर्णधार केन विल्यम्सनने मिशेलला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू दिला.

या दोघांनी एकेरी, दुहेरी आणि मोक्याच्या क्षणी चौकार – षटकार ठोकत भारतावर दबाव वाढवला. न्यूझीलंड विजयाकडे सहज वाटचाल करत असताना मिशेल बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 3 षटकारांसह 49 धावा केल्या. त्यानंतर विल्यम्सनने डेव्हॉन कॉन्वेला सोबत घेत 15 व्या षटकोत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यम्सन 33 धावांवर नाबाद राहिला. सोधीला 'सामनावीर' पुरस्कार देण्यात आला. (India v New Zealand )

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर अंतिम संघात बदल होणार हे अपेक्षित होते. परंतु, टीम इंडियाने बॅटिंग ऑर्डरमध्येही बदल केला. नियमित सलामीवीरांपेक्षा वेगळा प्रयत्न म्हणून इशान किशन आणि के. एल. राहुल ही जोडी आजमावून पाहिले; पण न्यूझीलंडने त्यांचा प्रयोग अयशस्वी ठरवला.

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने इशानला (4) तर, 'पॉवर प्ले'च्या शेवटच्या षटकात टीम साऊदीने राहुलला (18) झेलबाद केले. पॉवर प्लेमध्ये भारताला 2 बाद 35 धावांच करता आल्या. तिसर्‍या क्रमांकावर आलेला रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीकडून आधाराची अपेक्षा होती; पण फिरकीरपटू ईश सोधीने दोघांना जाळ्यात अडकले. रोहित (14) तर विराट (9) धावांवर तंबूत परतले.

त्यानंतर ऋषभ पंतही (12) माघारी परतला. संथ खेळणारा हार्दिकही 19व्या षटकात 24 चेंडूत 23 धावा करुन माघारी परतला. शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने 11 धावा कुटल्यामुळे भारताला शंभरीपार पोहोचता आले. 20 षटकात भारताने 7 बाद 110 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 2 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 26 धावा केल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने 20 धावांत 3 तर सोधीने 17 धावांत 2 बळी घेतले. (India v New Zealand)

गुणतालिकेतील गणिते

गट क्र. 2 मध्ये पाकिस्तान पहिले तीनही सामने जिंकून सहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे. अफगाणिस्तान 4 गुणांसह दुसर्‍या स्थानावर असला तरी त्यांची धावगती गटात सर्वात चांगली म्हणजे +3.097 आहे. न्यूझीलंड 2 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. पाकिस्तानला सेमीफायनलला जाण्यासाठी आता फक्त एका विजयाची आवश्यकता आहे.

त्यामुळे दुसर्‍या स्थानासाठी चुरस आहे. स्पर्धेत टिकून रहायचे असेल तर भारताला पुढचे तिनही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. शिवाय इतर सामन्यांच्या निकालाकडेही लक्ष ठेवावे लागेल. बुधवारच्या न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्यानंतर स्पर्धेचे चित्र बर्‍यापैकी स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news