Harmanpreet Kaur : हरमनप्रीतच्या बंदीवर बीसीसीआयची प्रतिक्रिया, जय शाह म्हणाले.. | पुढारी

Harmanpreet Kaur : हरमनप्रीतच्या बंदीवर बीसीसीआयची प्रतिक्रिया, जय शाह म्हणाले..

पुढारी ऑनलाईन डेस्क : Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात हरमनने चांगलाच गोंधळ घातला होता. त्यानंतर आयसीसीने तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली. त्यातच आता बीसीसीआय हरमनप्रीतवर कोणती कारवाई करणार आहे याबाबत मंडळाचे सचिव जय शाह यांनी मोठा खुलासा केला आहे.

जय शाह म्हणाले, हरमनप्रीतच्या आक्रमक वर्तनाबद्दल बीसीसीआय तिच्याशी बोलणार आहे. मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. दोघेही हरमनप्रीतशी (Harmanpreet Kaur) सविस्तर चर्चा करतील. ‘ते दोघेही हरमनप्रीतला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान केलेल्या कृतीबद्दल प्रश्न विचारतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बांगलादेशविरुद्धच्या त्या सामन्यात बाद झाल्यानंतर हरमनने (Harmanpreet Kaur) रागाच्याभरात स्टंपवर बॅट मारली होती. तसेच, सामना संपल्यानंतर बोलताना तिने पंचांवर आगपाखड करून जोरदार टीका केली होती. सामना संपल्यानंतरही हरमनचा राग स्पष्ट दिसत होता. तिने ट्रॉफी प्रेझेंटेशन दरम्यान बांगलादेशी कर्णधाराचाही अपमान केला. तिच्या ता कृतींची दखल आयसीसीने घेतली आणि हरमनवर कारवाई केली. आयसीसीने निवेदनात म्हटले की, ‘हरमनप्रीतने आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.8 चे उल्लंघन केले आहे. तिच्यावर दोन सामन्यांच्या बंदी घातली गेली असून लेव्हल टू गुन्ह्यासाठी तिच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याअंतर्गत तिला तीन डिमेरिट पॉइंटही देण्यात आले आहेत.’

आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांत चार डिमेरिट गुण मिळाले तर त्या खेळाडूला एक कसोटी किंवा दोन वनडे किंवा दोन टी-20 सामन्यांसाठी निलंबित करण्यात येते. यानुसार हरमनप्रीत पुढील दोन वनडे खेळू शकणार नाही. भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झाला असून यामुळे संघाला निश्चितच धक्का बसला आहे. हरमनच्य गैरहजेरीत आता स्मृती मानधना संघाचे नेतृत्व करेल.

Back to top button