ban w vs india w odi : भारत-बांगलादेश यांच्यातील निर्णायक सामना बरोबरीत सुटला

ban w vs india w odi : भारत-बांगलादेश यांच्यातील निर्णायक सामना बरोबरीत सुटला

पुढारी ऑनलाईन डेस्क : ban w vs india w odi match tied : भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बरोबरीत सुटला आहे. टीम इंडियाला शेवटच्या षटकात फक्त एक विकेट शिल्लक असताना विजयासाठी 3 धावांची गरज होती. मारुफा अख्तरने विजयाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारतीय संघाला धक्का देण्याचे काम केले. शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मेघना सिंहला मारुफाने झेलबाद केले. याचबरोबर हा सामना बरोबरीत सुटला आणि तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली.

भारतापुढे होते 226 धावांचे लक्ष्य

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 50 षटकांत 4 गडी गमावून 225 धावा केल्या. यजमानांकडून फरगाना हकने सर्वाधिक 107 धावा केल्या तर शमीमा सुलतानाने (52) अर्धशतक झळकावले. अखेरीस शोभनाने 22 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. याचबरोबर भारताला विजयासाठी 226 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताच्या स्नेहा राणाने 2 बळी घेतले.

स्मृती आणि हरलीनची खेळी व्यर्थ

226 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि दुसऱ्याच षटकात शेफाली वर्मा 4 धावा करून बाद झाली. भारताला पहिला धक्का 11 धावांवरच बसला. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेला यस्तिका भाटियाही 12 धावांवर बाद झाली. भारताकडून स्मृती मंधानाने 59 आणि हरलीन देओलने 77 धावा केल्या.

पावसानंतर सामना फिरला

भारताच्या फलंदाजीदरम्यान 38व्या षटकात पावसामुळे व्यत्यय आला. पाऊस आला तेव्हा भारताची धावसंख्या 4 गडी गमावून 173 धावा होती आणि विजयासाठी 12 षटकात 53 धावा हव्या होत्या. पाऊस थांबल्यानंतर सामना सुरू झाला तेव्हा षटके कमी करण्यात आली नाही, पण सामना फिरला. त्यानंतर टीम इंडियाने 52 धावा केल्या, पण 6 विकेट गमावल्या. जेमिमा रॉड्रिग्ज 33 धावांवर नाबाद राहिली.

भारतीय महिला संघाने टी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता. त्यामुळे टीम इंडिया वनडे मालिका जिंकेल असा विश्वास होता, पण त्यांना विजयी कामगिरी बजावता आलेली नाही. शनिवारी झालेल्या सामन्यात शेवटच्या 9 षटकांत भारताला विजयासाठी 36 धावांची गरज होती आणि 6 विकेट्स शिल्लक होत्या. पण तरीही भारतीय महिला संघाला हा सामना जिंकता आला नाही. याआधी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताला हरवून इतिहास रचला होता. बांगलादेश महिला संघाचा हा भारताविरुद्धचा पहिला एकदिवसीय विजय होता. आता या संघाने भारताला मालिका जिंकण्यापासून रोखले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news