पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Century : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन कसोटी सामन्यात शतक झळकावले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (21 जुलै) कोहलीने शॅनन गॅब्रिएलच्या चेंडूला सीमापार पाठवून आपले शतक पूर्ण केले. त्याने 180 चेंडूंमध्ये 10 चौकारांच्या मदतीने शतकी खेळी साकारली. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील 29 वे शतक ठरले. या शतकासह विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या आता 76 वर पोहोचली आहे.
या वर्षी अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीची कसोटी शतकाची प्रतीक्षा संपली. 2019 नंतर विराटने 2023 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते. दरम्यान, कोहलीने डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला गेली चाडेचार वर्षे विदेशी मैदानांवर शतकी खेळी साकारता आली नाही. मात्र ती प्रतीक्षाही आता संपली आहे. विराटने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (WI vs IND) शतक फटकावून चाहत्यांना खुश केले आहे. विदेशात कसोटी शतक झळकावण्यासाठी विराटला 1678 दिवस आणि 31 डावांची वाट पाहावी लागली.
विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे, जो त्याने शानदार खेळी खेळून संस्मरणीय बनवला आहे. 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी एकाही फलंदाजाला 500 व्या सामन्यात 50 धावाही करता आलेल्या नाहीत. याआधी 500 व्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता, ज्याने 48 धावांची खेळी केली होती.
या शानदार खेळीदरम्यान, विराट कोहली जॅक कॅलिसला मागे टाकत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आला. या डावात विराटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 2000 धावाही पूर्ण केल्या. भारतीय फलंदाजांमध्ये विराटशिवाय केवळ रोहित शर्मालाच ही कामगिरी करता आली आहे.
13 – सुनील गावस्कर
12 – जॅक कॅलिस
12 – विराट कोहली
11 – एबी डिव्हिलियर्स
44- सचिन तेंडुलकर (भारत)
35- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
30- महेला जयवर्धने (श्रीलंका)
25- विराट कोहली (भारत)
24- ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)
कोहलीचे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी फॉर्मेटमधील हे तिसरे शतक आहे. आपल्या शतकी खेळीदरम्यान त्याने विंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात 1000 धावाही पूर्ण केल्या. त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्ध 1000 हून अधिक कसोटी धावा केल्या आहेत. यापूर्वी त्याने कॅरेबियन संघाविरुद्ध 6 अर्धशतके आणि एक द्विशतक (200 धावा) झळकावले आहे.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत जॅक कॅलिसला (25,534) मागे टाकले होते. तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा 5 वा खेळाडू बनला आहे. या यादीत फक्त सचिन तेंडुलकर (34,357), कुमार संगकारा (28,016), पाँटिंग (27,483) आणि जयवर्धने (25,957) हे त्याच्या पुढे आहेत. कोहली हा सचिन (100 शतके) नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (76) करणारा फलंदाज आहे. (Virat Kohli Century)