युरो कप २०२० : पराभवानंतर इंग्लिश प्रेक्षकांचा धुडगूस | पुढारी

युरो कप २०२० : पराभवानंतर इंग्लिश प्रेक्षकांचा धुडगूस

युरो कप २०२० : इटलीने मिळवलेला हा विजय इंग्लिश चाहत्यांना पचवता आला नाही. वेम्बले स्टेडियमच्या बाहेर इंग्लिश आणि इटालियन फुटबॉल चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पराभव पचवता न आल्याने इंग्लिश चाहत्यांनी उगचाच इटालियन फुटबॉलप्रेमींवर हल्ला केला. इंग्लिश चाहते फक्‍त इटालियन फुटबॉलप्रेमींवर हल्ला करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी वर्णद्वेषी शेरेबाजीदेखील केली.

इटलीच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला. सोशल मीडियावर इंग्लिश चाहत्यांच्या बेशिस्त वर्तनाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. वेम्बले स्टेडियमच्या बाहेर मोठ्या संख्येने इंग्लिश फुटबॉलप्रेमी जमा झाले होते. विजयानंतर आपल्याला जल्लोष, पार्टी करण्याची संधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती; पण पराभव पदरी पडल्याने त्यांनी धुडगूस घातला.

‘ते’ तिघे खेळाडू वर्णभेदाचे शिकार

‘युरो कप २०२०’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा पराभव झाला. यात इंग्लंडच्या मार्क्स रॅशफोर्ड, जेडॉन सँचो आणि बुकायो साका या कृष्णवर्णीय खेळाडूंनी पाच पैकी 3 पेनल्टी ‘मिस’ केल्या. यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी तिन्ही खेळाडूंवर वर्णभेदी टीका सुरू केली आहे. यानंतर इंग्लंड फुटबॉल असोसिएशनने यावर नाराजी व्यक्‍त केली आहे.

वर्णभेदी टीका केल्याप्रकरणी जे लोक दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी खेळाडूंवर वर्णभेदी टीका केल्याचा निषेध केला आहे. देशाला उपविजेतेपद मिळाले हेही काही कमी नाही, इंग्लंडच्या फुटबॉल टीमला हिरो संबोधले पाहिजे. खेळाडूंवर वर्णभेदी टीका चुकीची आहे आणि जे लोक असे करीत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी खडसावले आहे.

सोशल मीडियावर मार्क्स रॅशफोर्ड, जेडॉन सँचो आणि बुकायो साका या तिघांच्या फोटोवर माकडांचे इमोजी वापरले जात आहेत. त्याचबरोबर अश्‍लील भाषेत शिवीगाळ करण्यात येत आहे. इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू रहिम स्टर्लिंगवरही टीका करण्यात आली आहे.

55 वर्षांनंतर मोेठ्या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडला इटलीने 3 विरुद्ध 2 असे शूट आऊट करीत युरो चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

युरो कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटमध्ये इटलीने जवळपास पाच दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आणत दुसर्‍यांदा ट्रॉफी पटकावली.

युरोच्या इतिहासात 1976 नंतर दुसर्‍या फायनलचा निकाल हा पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. 1976 मध्ये चेक प्रजासत्ताकचा संघ पेनल्टी शूटआऊटमध्ये वेस्ट जर्मनीला पराभूत करून चॅम्पियन ठरला होता.

Back to top button